लग्नातील सावधान महत्त्वाचे
By Admin | Published: May 15, 2014 11:17 PM2014-05-15T23:17:28+5:302024-02-09T15:21:44+5:30
श्रीरामपूर : विवाहाच्या वेळी मंगलाष्टक म्हणताना सावधान असे पुरोहित म्हणतात.
श्रीरामपूर : विवाहाच्या वेळी मंगलाष्टक म्हणताना सावधान असे पुरोहित म्हणतात. पण वधू-वर या सूचनेचे पालन न करता सावधानतेने प्रपंच करीत नाहीत. उलट प्रपंचासाठी अनेक पाप कर्म करून पुण्य कर्माकडे दुर्लक्ष करतात. जीवनात सावधानतेला महत्त्व देऊन धर्म साधना करून अंतर्त्म्यात प्रवेश करुन पुण्य कर्माकडे वाटचाल करा. प्रपंच व जीवन सुखी, आनंदी होईल, असा उपदेश जैन साध्वी सुशिलाजी यांनी दिला. श्रीरामपूरच्या जैन स्थानकात आगमश्रीजी, चैतन्यश्रीजी, सुबोधिनी तसेच संयमप्रभाजी, श्रृतप्रभाजी व चिंतनप्रभाजी या साध्वींसह त्यांचे जैन स्थानकात वास्तव्य आहे. यानिमित्त दररोज सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान प्रवचन होत आहे. साध्वी सुशिलाजी म्हणाल्या, स्वत: जागृत राहणे गरजेचे आहे. प्रथम स्वत:च्या घरात एकीचे वातावरण निर्माण करून समाजात एकी राखण्याचा प्रयत्न करा. जीवनातील पाप, पुण्याचे मूल्यमापन करा. पापापासून दूर रहा. त्यासाठी सावधपणे कार्य करा. संसारात पावलोपावली दु:ख आहे. ते दूर होण्यासाठी पुण्य कर्म करा. जन्मदिन, लग्न आदी सोहळ्यांवर खर्च करण्याऐवजी दीन दु:खितांना मदत करुन पुण्य करा. मानवजन्म मिळाल्याच्या आनंदापेक्षा जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. संसार प्रपंच करून आत्म कल्याणासाठी धर्म साधना करून जीवनात सुखाचा आनंद अनुभवा, असे साध्वी संयमप्रभाजी म्हणाल्या. (वार्ताहर)