लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:48 AM2023-05-22T08:48:29+5:302023-05-22T08:48:37+5:30

ती म्हणाली, आमचे प्रेमसंबंध..याने अनेकदा केला अत्याचार

Wedding procession, woman's complaint and bridegroom in police | लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात

लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात

लोकमत न्यूज नेटवर्क
राहाता (जि. अहमदनगर) : डीजेच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी अन् घोड्यावर बसून लग्नाची स्वप्न रंगवणारा नवरदेव, असा आनंदाचा माहाेल असतानाच नाशिक येथील महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला पोलिस ठाण्यात नेले. बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आल्याने वऱ्हाडी मंडळींचा हिरमाेड झाला. दरम्यान, उच्चशिक्षित नववधूसाठी नातेवाइकांनी नात्यातीलच वर शोधला अन् काही तासांतच नववधूचा विवाह दुसऱ्या नवरदेवासोबत लावून दिला. ही घटना रविवारी राहाता येथे घडली.

नाशिकच्या युवकाचा राहातामधील मुलीशी विवाह ठरला हाेता. रविवारी नवरदेव वऱ्हाडींसह येथे दाखल झाला. विवाह समारंभाची तयारी झाली. मिरवणूकही निघाली. दरम्यान, नाशिक येथील एका महिलेने आमचे प्रेमसंबंध असून लग्नाचे आमिष दाखवून याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केला व माझी फसवणूक केल्याची तक्रार राहाता पोलिसांत दिली. 

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मिरवणुकीतून नवरदेवाला ताब्यात घेतले. नाशिकच्या या नवरदेवाविरुद्ध तेथीलच उच्चशिक्षित २६ वर्षीय महिलेने तक्रार दिल्याने एकच गोंधळ उडाला.  
अक्षतारूपी आशीर्वाद प्राप्त होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता मंगलकार्यालयात पसरली व वऱ्हाडींत एकच गोंधळ उडाला. विवाहस्थळी काही अनर्थ नको म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्याचवेळी नवरदेवाकडून आलेल्या वऱ्हाडींनी मंगलकार्यालयातून काढता पाय घेतला. नवरदेवाचे नाशिक प्रकरण समोर आल्यावर नियोजित वधूचे त्याच्यासोबत लग्न न लावण्याचा निर्णय झाला.

मंडपातच शोधला दुसरा वर 
  आध्यात्मिक संस्कार व उच्चशिक्षित असलेल्या नववधूसाठी नातेवाइकांनी नात्यातीलच वर मंडपात शोधला. 
  शोधलेला नवरदेव मोठ्या मनाने पुढे आला. 
  उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने अक्षतारूपी आशीर्वादाने काही तासांतच या नववधूचा विवाह दुसऱ्या नवरदेवासोबत लावण्यात आला.

Web Title: Wedding procession, woman's complaint and bridegroom in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न