कोकमठाणमध्ये शिवनेरी-लखनौ शिवज्योतीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 08:26 PM2018-02-14T20:26:29+5:302018-02-14T20:27:37+5:30
उत्तर प्रदेशातील मराठा समाजाच्या २०० शिवपे्रमींच्या शिवनेरी ते लखनौ दरम्यान दुचाकीवरून निघालेल्या शिवज्योत यात्रेचे कोकमठाणच्या आत्मा मालिक ध्यानपिठात बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आले.
कोपरगाव : उत्तर प्रदेशातील मराठा समाजाच्या २०० शिवपे्रमींच्या शिवनेरी ते लखनौ दरम्यान दुचाकीवरून निघालेल्या शिवज्योत यात्रेचे कोकमठाणच्या आत्मा मालिक ध्यानपिठात बुधवारी जोरदार स्वागत करण्यात आले.
उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी शिवपे्रमींनी यंदा शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र व उत्तरप्रदेशातील मराठा समाज एकत्रित करण्याचा संदेश देत मंगळवारी शिवनेरी गडावरून शिवज्योत घेऊन ही यात्रा निघाली. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आत्मा मालिक ध्यानपिठात शिवज्योत यात्रेचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आश्रमाचे महंत जंगलीदास महाराज यांच्या सान्निध्यात शिवपे्रमींनी ध्यान केले.
संत परमानंद महाराज व संत देवानंद महाराज यांनी ध्यानपिठाच्या कार्याची माहिती देत शिवपे्रमींचा सत्कार केला. यात्रेचे प्रमुख पांडुरंग राऊत यांनी ध्यानपिठातील सद्गुरू माऊलींच्या दर्शनाने धन्य झाल्याचे सांगितले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर, संघटक संतोष पाटील, आयोजक प्रतिभा आहेर, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यंवशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कार्याध्यक्ष विठ्ठल होन, प्रकाश भट, प्रकाश गिरमे, प्राचार्य निरंजन डांगे, प्राचार्य सुधाकर मलिक आदी उपस्थित होते.
२०० कार्यकर्त्यांचा समावेश
शिवनेरी ते उत्तर प्रदेश अशी १ हजार ६०० किलोमीटर अंतराची ही शिवज्योत यात्रा आहे. १९ फेबु्रवारीस लखनौ येथे शिवज्योत पोहचल्यावर मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या यात्रेत ७० वर्षाचे नवनाथ शिंदे व एकमेव महिला शिवपे्रमी प्रतिभा आहेर यांच्यासह २०० कार्यकर्त्यांचा समावेश आहे.