अभद्र राजकारण्यांचा ‘नगर पॅटर्न’ कशासाठी ? - डॉ. निलम गो-हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:06 PM2018-06-21T17:06:16+5:302018-06-21T17:07:36+5:30
केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी भेट घेतली.
अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी भेट घेतली. नगरमध्ये दहशत माजवण्याचा काही राजकीय नेत्यांचा डाव आहे. त्यासाठी सोय-यांनी एकत्र येऊन राजकीय तडजोडी सुरु केल्या आहेत. हा अभद्र नगर पॅटर्न कशासाठी झाला. या पॅटर्नमुळे राज्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, असे मत गो-हे यांनी व्यक्त केले.
डॉ. गो-हे यांनी कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. घटनेची पार्श्वभूमी समजून घेत त्या म्हणाल्या, नगर मध्ये सोय-यांनी एकत्र येत दहशत निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. यातूनच हे हत्याकांड घडले. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले. हे अधिकारी नगरमधून जोपर्यंत हलवले जाणार नाहीत तोपर्यंत तपास योग्य होणार नाही. याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, दोषारोपपत्र दाखल होणार असल्याने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हवेत. यासाठी सीआयडीला विनंती करणार असून मृतांच्या पत्नींना स्वरक्षणासाठी शस्त्रे दिली जावीत, अशी विशेष मागणी मी अधिवेशनात करणार आहे. यावेळी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने दोन्ही कुटुंबाना प्रत्येकी एक लाखांची मदत गो-हे यांनी दिली. शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, भारत कांडेकर , अमोल येवले, पप्पू भाले व पुणे येथील सेना पदाधिकारी उपस्थित होते.