राष्ट्रवादीच्या आमदारांचं नक्की ठरलंय काय?
By सुधीर लंके | Published: July 26, 2019 11:57 AM2019-07-26T11:57:45+5:302019-07-26T12:03:05+5:30
राष्ट्रवादीचे तीनही आमदार पक्षाने घेतलेल्या मुलाखतींना गैरहजर राहतात हा निव्वळ योगायोग वाटत नाही.
सुधीर लंके
अहमदनगर : राष्ट्रवादीचे तीनही आमदार पक्षाने घेतलेल्या मुलाखतींना गैरहजर राहतात हा निव्वळ योगायोग वाटत नाही. ही त्यांनी ठरवून केलेली कृती दिसते. हे तीनही आमदार राष्ट्रवादीकडून लढावे की नाही या द्वंद्वात दिसतात. वैभव पिचड यांचे तर भाजपसोबत जाण्याचे जवळपास ठरले आहे. इतरांचेही काहीतरी ठरले आहे. मात्र, ते पत्ते अजून खोलत नसावेत.
नगर जिल्ह्यात बारा-शून्य अशी परिस्थिती करु, असा इशारा सुजय विखे यांनी दोन्ही काँग्रेसला दिला होता. म्हणजे बाराच्या बारा आमदार युतीचे करु असे त्यांना म्हणायचे आहे. विखे यांनी प्रयत्न करण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे मंडळीच भाजपकडे निघाले आहेत़ सध्या राष्ट्रवादी व दोन्ही काँग्रेसचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे तीनही आमदार या पक्षात राहतील का? असा संशयकल्लोळ आहे. राष्ट्रवादीने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गुरुवारी पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती बोलविल्या होत्या. या मुलाखतींना तीनही आमदारच गैरहजर होते. राहुल जगताप अगदी शेवटी आले.
पिचड यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करुन प्रवेशाचा मुहूर्त ठरविला असल्याचे समजते. त्यांच्या अकोले या मतदारसंघात भाजपने गत पाच वर्षात एकही मोठे भरीव काम होऊ दिले नाही, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. पुन्हा भाजपची सत्ता आली तर तीच कोंडी होईल. देशातील वातावरण पाहता पराभव होण्याचा धोकाही नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपचा रस्ता धरा, असा आग्रह त्यांना कार्यकर्त्यांनी केल्याचे समजते. पिचड यांना थेट मुख्यमंत्र्यांनी पक्ष प्रवेशाची आॅफर दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. मधुकर पिचड हे शरद पवार यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजप-सेनेला नेहमी जातीवादी पक्ष म्हणून संबोधले. त्यांचा ‘स्वभावधर्म’ हा युतीचा नाही. भाजपमध्ये जाण्याची त्यांची स्वत:ची मानसिकता नसावी़ मात्र, त्यांनाही कार्यकर्त्यांकडून गळ घालणे सुरु आहे. ते स्वत: भाजपात न जाता केवळ वैभव यांचा प्रवेश होईल, अशी शक्यता आहे. पिचड यांच्या भाजप प्रवेशाने सेना-भाजपमधील स्थानिक कार्यकर्त्यांची व इच्छुकांची कोंडी होईल. पण, भाजपला आता आपल्या मूळ कार्यकर्त्यांचेही काही देणेघेणे उरले नाही़ त्यांच्या पालकमंत्र्यांनाही पक्षात काय चाललेय हे ठाऊक नसते.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप हेही पक्षापासून फटकून वागू लागले आहेत. नगर शहरात राष्ट्रवादीची मते घटली ही चिंता बहुधा जगताप यांना सतावत आहे.
नगर शहर हा शिवसेना-भाजप युतीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गत विधानसभेला शिवसेना-भाजप स्वतंत्र्य लढल्यामुळे चौरंगी लढतीत जगताप यांना संधी मिळाली. यावेळी सेना-भाजप यांची युती झाली तर मुकाबला करणे अवघड आहे, अशी धास्ती बहुधा जगताप यांना आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या हवेवर स्वार होण्याचा त्यांचाही प्रयत्न असल्याचे बोलले जाते. अर्थात युती होणार की हे पक्ष स्वतंत्र लढणार? याचा अंदाज ते घेत असावेत. भाजप-सेना स्वतंत्र लढले तर जगताप हे कदाचित भाजपचे उमेदवार राहू शकतात. सेनाही ऐनवेळी उमेदवार बदलू शकते, अशी चर्चा आहे. अनिल राठोड यांचा एकदा पराभव झाला असल्याने यावेळची उमेदवारी कोणाला? हा प्रश्न सेनेच्या गोटातही चर्चेत आहेच.
राहुल जगताप यांचेही नाव आता पक्षांतराच्या यादीत आले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात आता विखे फॅक्टर महत्त्वाचा आहे. भाजपला या मतदारसंघात विधानसभेला आजवर यश मिळालेले नाही. मात्र विखेंमुळे तेथे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे जगताप कदाचित अस्वस्थ आहेत. त्यांच्या कारखान्याच्याही काही अडचणी आहेत. विरोधकांची भाजपने जी कोंडी केली ती उदाहरणे जगताप यांच्यासमोर आहेत. त्यामुळे संघर्ष करण्यापेक्षा भाजपमध्ये प्रवेश करुन पुन्हा आमदार होता आले तर तेही जगताप यांना हवेच असणार. ते आज राष्ट्रवादीच्या मुलाखतीला उशिरा आल्यामुळे त्यांच्याकडेही संभ्रमाने पाहिले जात आहे.
राष्ट्रवादीचे तीनही आमदार पक्षातून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी निवडणुकीअगोदरच शून्यावर येण्याचा धोका आहे. भाजपची वाढलेली ताकद, भाजपच्या हातात असलेली सत्ता, सत्तेतून त्यांनी निर्माण केलेली राजकीय दहशत या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादीचे आमदार बहुधा धास्तावले आहेत. ही धास्ती या आमदारांत नसेल तर त्यांनी त्याबाबतची स्पष्टता करणे आवश्यक आहे. तरच संशयकल्लोळ दूर होईल.