त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? केले ते राजकारणच: PM मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:05 AM2023-10-27T06:05:03+5:302023-10-27T06:05:41+5:30
तुम्ही यापूर्वी केवळ घोटाळ्यांचे आकडे ऐकले. आम्ही विकास निधींचे आकडे ऐकवितो. आम्ही एमएसपी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी (जि. अहमदनगर) : देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटींचे धान्य आधारभूत किमतीवर खरेदी केले. आम्ही एवढ्याच वर्षांत साडेतेरा लाख कोटींची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे दिले, अशी तुलना करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
मराठीतून भाषणाला केली सुरुवात
मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात करीत शिर्डीत साई शताब्दी महोत्सवाला आपण उपस्थित होतो व त्यावेळी भूमिपूजन झालेल्या दर्शनरांग संकुलाचे लोकार्पणही आपणच करीत आहोत ही बाब पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केली. ते म्हणाले, गरिबांचा विकास हे आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रेशन आणि घरांसाठी पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत आम्ही सहापट अधिक निधी दिला आहे.
तेव्हा घोटाळ्यांचे आकडे, आता विकास निधींचे...
तुम्ही यापूर्वी केवळ घोटाळ्यांचे आकडे ऐकले. आम्ही विकास निधींचे आकडे ऐकवितो. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना तरसावले. १९७० मध्ये मान्यता मिळालेल्या निळवंडे धरणाचे आज लोकार्पण झाले. आमच्या सरकारने गती दिल्याने हे शक्य झाले. महाराष्ट्रातील कृषिमंत्र्यांच्या काळात शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. आम्ही एमएसपी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’त महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये टाकणार आहे. मोदींच्या
हस्ते उद्घाटनसमयी १७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले.
‘पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी द्या’
पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीत वळविण्यासाठी राज्याने प्रकल्प तयार केला आहे. याचा विदर्भ, मराठवाड्याला फायदा होईल, यासाठी केंद्राची मदत आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
१०९ कोटी खर्चून तीन मजली दर्शन रांग : शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशांतील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शन रांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे.