‘अरे या सरकारचे करायचे काय’, नगरमध्ये आशा स्वयंसेविकांचा घुमला नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:09 PM2018-01-17T16:09:52+5:302018-01-17T16:10:11+5:30
‘मानधन नको, वेतन द्या’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा जोरदार घोषणांनी जिल्ह्यातील आशा व प्रवर्तक महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.
अहमदनगर : ‘मानधन नको, वेतन द्या’, ‘अरे या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, अशा जोरदार घोषणांनी जिल्ह्यातील आशा व प्रवर्तक महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला.
आशा व प्रवर्तकांना सरकारने मानधन नव्हे तर वेतन द्यावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आशा स्वयंसेविका सरकारविरोधात आंदोलन छेडत आहेत. बुधवारी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारीही सरकारच्या निषेधार्थ आशा स्वयंसेविका व प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेत गेट बंद आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्त्व कॉ. सुभाष लांडे, अॅड. सुधीर टोकेकर यांनी केले.