आघाडीच्या नेत्यांनी काय दिवे लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:29+5:302021-09-22T04:24:29+5:30
रूईछत्तीसी : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजार समितीवर टीका सुरू केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ...
रूईछत्तीसी : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजार समितीवर टीका सुरू केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ठेकेदाराकडून टक्केवारी घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेच्या माध्यमातून काय दिवे लावले हे सांगावे? ठराविक लोकांना कामे द्यायची आणि इतर ठेकेदारांचे टेंडर मागे घ्यायचे, अशी यांची भूमिका आहे, अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली.
मठपिंप्री (ता. नगर) येथे सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.
कर्डिले म्हणाले, नगर तालुक्यात बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. गेल्या १५ वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. खेळते भांडवल देण्यास टाळाटाळ होत होती. या माध्यमातून शेतकऱ्यांना २०० कोटी रुपये कर्ज मंजूर केले. शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही तर त्याची जबाबदारी मी घेणार, अशी भूमिका घेतली. माजी सरपंच अंकुश नवसुपे यांनी बीड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाची मागणी कर्डिले यांच्याकडे केली. हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यावर कडिले म्हणाले, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न का मार्गी लावला नाही. बाजार समितीने कोविड सेंटर सुरू केले. त्यातही यांनी राजकारण केले.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक श्रीकांत जगदाळे, माजी अध्यक्ष जनार्दन चौधरी, राष्ट्रवादीचे दादासाहेब दरेकर, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग यांची भाषणे झाली.
यावेळी माजी सभापती राम साबळे, मठपिंप्रीचे सरपंच हौसराव नवसुपे, उपसरपंच संदीप उकांडे, सेवा संस्था अध्यक्ष अशोक कामठे, उपाध्यक्ष पोपट दोबोले, माजी उपसरपंच अंकुश नवसुपे, गुंडेगावचे सरपंच सकट, ग्रामपंचायत सदस्य, राळेगणचे सरपंच सुधीर भापकर, वडगावचे सरपंच अनिल ठोंबरे, हातवळणचे सरपंच बाळासाहेब मेटे, ज्येष्ठ नेते बबन हराळ, सचिव संजय वाळके, ग्रामपंचायत सदस्य संजय कदम, कांतीलाल कळमकर, शरद नवसुपे, सुभाष बोरकर आदी उपस्थित होते.