विखेंच्या मतदारसंघात आज थोरात काय बोलणार? संपूर्ण राज्याचे लागले लक्ष
By शेखर पानसरे | Published: October 27, 2024 10:59 PM2024-10-27T22:59:14+5:302024-10-27T22:59:30+5:30
लोणीतील लोमेश्वर मंदिर प्रांगणात सभा
संगमनेर : शिर्डी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे या सोमवारी (दि.२८) राहाता येथे त्यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडून दाखल करणार आहेत. त्यापूर्वी सकाळी १० वाजता लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिर प्रांगणात सभा होईल, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात हे प्रमुख उपस्थित असतील. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गावात, मतदारसंघात आमदार थोरात काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
सभेसाठी खासदार नीलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित राहतील, अशीही माहिती आहे. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील सभेत वसंत देशमुख यांनी आमदार थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर संगमनेर तालुक्यात वातावरण तणावाचे आहे. चारचाकी वाहन जाळले, काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. आंदोलन केले, मूक मोर्चा काढण्यात आला. काही प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
मास्टरमाईंड शोधल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही ; विखेंचा इशारा
रविवारी मंत्री विखे-पाटील हे संगमनेरात आले होते. स्वच्छ, सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला आहे. भगिनींना पुढे करून राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर आली. ठेकेदाराच्या जीवावर सामान्य माणसांना खेटलात, आता गाठ आमच्याशी आहे. धांदरफळ घटनेमागील मास्टरमाईंड शोधल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशारा विखे-पाटील यांनी दिला आहे. माजी खासदार डॉ. विखे-पाटील हे सुद्धा संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात युवा संकल्प मेळावे घेत आमदार थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. अशा परिस्थितीत विखे-थोरात हा संघर्ष अधिकच तीव्र बनला आहे. त्यामुळे लोणी येथे सभा होत असून यावेळी आमदार थोरात काय बोलणार?, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागून आहे.