कितीही ताकद लावा, विजय विचारांचाच होईल : डॉ.सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:53 PM2019-04-26T12:53:28+5:302019-04-26T12:54:30+5:30
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसले होते.
संगमनेर : मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसले होते. पण महायुतीचा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा होता. प्रामाणिक भावनेने कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळेच आपला विजय निश्चित आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघ काबिज करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून खासदार लोखंडेंच्या पाठिशी उभे रहावे. कोणी कितीही ताकद
लावू द्या, विजय हा विचारांचाच होईल, असा विश्वास विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ.सुजय विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे, तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे रावसाहेब डुबे, डॉ.सोमनाथ कानवडे, कैलास तांबे, गुलाबराव सांगळे, किशोर नावंदर, शहराध्यक्ष अमर कतारी, राजेंद्र सांगळे, जयवंत पवार, अप्पा केसेकर, ज्ञानेश्वर कर्पे, सुधाकर गुंजाळ, दादासाहेब गुंजाळ, अॅड. रामदास शेजूळ, राजेंद्र देशमुख, जालिंदर वाकचौरे, नगरसेविका मेधा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विखे म्हणाले, या तालुक्याच्या नेत्यांनी मला नगरमध्ये येऊन विनाकारण विरोध केला. त्याची परतफेड करण्यासाठी मी आता तालुक्यात आलो आहे. मी माझ्या निवडणुकीत सर्वांना आव्हान दिले होते. ज्यांना ज्यांना मला विरोध करायचा आहे त्यांनी आवर्जून यावे. कारण मला विश्वास होता की महायुतीचा प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्ता माझ्या पाठिशी होता. विकासाच्या मुद्यांवर मी
बोलत होतो. सामान्य माणसाला मी विश्वास दिला. म्हणूनच या निवडणुकीचे परिवर्तन विजयात होणार आहे.
शिर्डी मतदारसंघातही हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. कोणी कितीही ताकद लावू द्या, गाव पातळीवर तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. अंतर्मनातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवा. आपला विजय निश्चित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.