स्कूल बसची चाके थांबली; मालक-चालकांवर कर्जाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:45+5:302021-05-20T04:21:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने स्कूल बसची चाके गेल्या १४ महिन्यांपासून जागेवरच थांबली आहेत. ...

The wheels of the school bus stopped; A mountain of debt on the owner-operator | स्कूल बसची चाके थांबली; मालक-चालकांवर कर्जाचा डोंगर

स्कूल बसची चाके थांबली; मालक-चालकांवर कर्जाचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने स्कूल बसची चाके गेल्या १४ महिन्यांपासून जागेवरच थांबली आहेत. स्कूल बसच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मालकांपासून ते चालक, मदतनीस या सर्वांवर उत्पन्नाचे साधन पूर्णपणे बंद झाल्याने मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतमजूर, बांधकाम कामगार अशी कोणतीही मिळेल, ती कामे करण्याची वेळ या व्यवसायाशी निगडित असलेल्यांवर आली आहे.

संगमनेर शहर व ग्रामीण भागात अनेक छोट्या-मोठ्या शिक्षणसंस्था आहेत. विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्यासाठी काही संस्थांकडे स्वत:च्या मालकीच्या स्कूल बसेस आहेत, तर काही संस्थांनी विद्यार्थी वाहतुकीकरिता बसचालकांशी करार केला आहे. स्कूल बसच्या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला. मात्र, आता कोरोनामुळे शिक्षणसंस्था, शाळा बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही जण बेरोजगार झाले आहेत. स्कूल बसमालकांचे अतोनात हाल होत असून, कर्ज काढून घेतलेल्या बसेसचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अनेकांनी या व्यवसायात मोठे भांडवल गुंतविले आहे. बसेस १४ महिन्यांपासून जागेवरच उभ्या आहेत. स्कूल बसचा देखभाल खर्च, विमा हप्त्याच्या खर्चाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

---------------

कर्जाच्या वसुलीसाठी तगादा

माझ्याकडे छोटा-मोठ्या मिळून एकूण सहा स्कूल बसेस आहेत. त्यावर बाराजण चालक-वाहक म्हणून काम करतात. कोरोनामुळे सध्या परिस्थिती बिकट बनली असतानादेखील त्यांना काही महिने पगार दिला. परंतु आता पगार देणे शक्यच नाही. उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. बँक, पतसंस्थेकडून कर्ज काढून स्कूल बसेस घेतल्या. हे कर्ज मोठ्या प्रमाणात थकले आहे. त्या कर्जांच्या वसुलीसाठी आता तगादा चालू आहे. दोन गायी आहेत. दुधाच्या मिळणाऱ्या पैशांतून कसेतरी घरखर्च भागवताे. अनेक समस्या, प्रश्न आहेत.

- सुरेश रावसाहेब गुंजाळ, संगमनेर खुर्द, ता. संगमनेर

---

मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी वारंवार फोन

स्कूल बसवर चालक म्हणून काम करतो. कोरोनामुळे शाळा १४ महिन्यांपासून बंद असल्याने पगार मिळत नाहीत. कोरोनाच्या भीतीने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांमुळे बाहेर पडता येत नाही. त्यामुळे गावातच शेतीचे मिळेल ते काम करतो. खासगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. माझी दोन मुले ज्या शाळेत शिक्षण घेतात, त्या शाळेकडून शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी वारंवार फोन येत आहेत.

-मधुकर नामदेव बडदे, नवले वस्ती, रायते, ता. संगमनेर

----------------

आठवड्यातून दोनच दिवस काम

स्कूल बसवर गेल्या आठ वर्षांपासून चालक म्हणून काम करतो. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे बांधकाम कामगार, शेतमजूर म्हणून काम केले. परंतु आता सिमेंट, विटा व इतर बांधकाम साहित्य उपलब्ध होत नसल्याने काम फारच कमी झाले. आठवड्यातून केवळ दोन दिवस काम मिळते. कुटुंबाचा खर्च सुरूच आहे. दवाखान्यातही पैसे लागतात. घेतलेले कर्ज, उसनवारी हे सर्व कसे करायचे? भविष्याची भीती वाटते.

- दगडू जबाजी रूपवते, रा. खांडगाव, ता. संगमनेर

----------------

परंतु कामे मोजकीच आहेत

संगमनेर शहर व तालुक्यात मिळून १५०हून अधिक स्कूल बसेस आहेत. असे सुरेश गुंजाळ यांनी सांगितले. या प्रत्येक स्कूल बसमालक-चालकांची परिस्थिती जवळ जवळ सारखीच आहे. काही शिक्षण संस्थांच्या बसेस आहेत. त्यावर काम करणारे चालक, मदतनीस यांनाही लॉकडाऊनच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनीही उदरनिर्वाहासाठी इतर कामे शोधली; परंतु कामे मोजकीच आहेत. त्यामुळे शेतमजूर, बांधकाम कामगार म्हणून कामाला जाण्याशिवाय अथवा फळे, भाजीपाला विक्री करण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नाही.

----------

शासनाने मदत करावी

स्कूल बसेससाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यावर व्याज वाढत चालले आहे. हे व्याज सरकारने माफ करावे. शिक्षणसंस्था, शाळा कधी सुरू होतील हे अजूनही माहीत नाही. त्यामुळे स्कूल बसचालक-मालक, मदतनीस यांच्या उदरनिर्वाहासाठी योग्य निर्णय घ्यावा. तात्काळ सरकारने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा स्कूल बसचालक-मालकांनी व्यक्त केली.

Web Title: The wheels of the school bus stopped; A mountain of debt on the owner-operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.