श्रीरामपुरातील लिलाव बंद पाडताच शेतक-यांना मिळाले गाळे, गोदाम, एक रुपयात जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:39 PM2017-12-22T13:39:01+5:302017-12-22T13:39:58+5:30
श्रीरामपूर बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेतला.
श्रीरामपूर : बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर्णय घेतला. तसेच बाजार समितीचे पदाधिकारी अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असणारे गाळे खाली करण्याचा निर्णयही समितीने घेतला.
शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सकाळीच बाजार समितीच्या आवारात जमा झाले. शेतक-यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. सभापती सचिन गुजर यांच्यासह संचालकांनी प्रारंभी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतक-यांनी आक्रमक होत बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव बंद पाडला.
बाजार समिती आवारातील भाजीपाला, फळ विक्रीसाठी बांधलेले गाळे आडते, व्यापा-यांना देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, बाहेरची दुकाने शेतक-यांनाच द्यावी, अशी जोरदार मागणी संघटनेकडून करण्यात आली. चर्चेअंती ती मान्य झाली.
गोदामाअभावी शेतमाल खरेदी केंद्र सुरू करता येत नसताना पदाधिकारी मात्र केवळ गाळे बांधण्याचा अट्टहास करतात. बेलापूर उपआवारातील गोदाम पाडून शॉपिंग सेंटर उभारण्याचा निर्णयदेखील आंदोलनाच्या रेट्यामुळे संचालक मंडळाला रद्द करावा लागला. शेतीपूरक कामे सोडून अन्य व्यवसायासाठी दुकानांचा वापर होतो, ती खाली करावीत अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. ती संचालक मंडळाने मान्य केली.
बाजार समितीत उभारणार शीतगृह
बाजार समितीत शीतगृह (कोल्ड स्टोअर) उभारणीचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शेतक-यांना पडलेल्या दरात शेतमाल विकावा लागतो. पुढील काळात त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या कोल्ड स्टोअरमध्ये शेतक-यांना त्यांचा माल साठवता येणार आहे.