जब जब फुल खिले ! रंगीबेरंगी फुलांनी बहरले नगरचे कास पठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:11 PM2018-09-16T16:11:22+5:302018-09-16T16:12:09+5:30
नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे गणेशोत्सव, मोहरम, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत.
योगेश गुंड
केडगाव : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे गणेशोत्सव, मोहरम, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बेरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र पाऊस लांबल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने फुलांच्या बाजारभावात तेजी राहणार आहे. येथील फुलांना देशभरातील फुलांच्या बाजारातून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे.
सध्या सुरु असलेला गणेशोत्सव व मोहरम तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्रउत्सव आणि दसरा तसेच त्यानंतर लगेच येणा-या दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर (ता.नगर)येथे फुलांचे मळे यासणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेर बरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास तसेच पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा, हंगा याठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून याभागात फुल शेती केली जाते. एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. तर यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी, भाग्यश्री, पूर्वा व्हाईट, सानिया यलो, ऐश्वर्या यासारखे शेवंतीचे प्रकार असून यांची लागवड करण्यात आली आहे. साधारण मार्च महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी पाऊस लांबल्याने फुलांच्या उत्पादनात ४० टक्के घट अपेक्षित आहे.
झेंडूमध्ये पिवळा, कलकत्ता, जंबो, मारी गोल्ड यासारख्या व्हरायटी आहेत. अकोळनेर येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी होत असते. मात्र नागपूर मार्केट मध्ये सर्वात जास्त माल जाऊनही तेथे शेतक-यांना सुविधा मिळत नाहीत अशी खंत माजी सरपंच अनिल मेहेत्रे व तुषार मेहेत्रे या शेतक-यांनी केली .
भावात तेजी राहणार
यंदा कमी पावसामुळे झेंडू-शेवंती याफुलांचे उत्पादन कमी होणार असल्याने आवक घटणार असून त्याचा परिणाम फुलांच्या भाववाढीत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चारपटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव आज प्रती किलो ३०० रुपये असला तरी सणासुदीत तो ४०० रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे. झेंडू ७० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. एकट्या अकोळनेर गावात गणेशोत्सव व मोहरमसाठी ५ कोटींची उलाढाल झाली आहे.
सौंदर्य वाढले अन सुगंध मावळला
फुल शेतीत नवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने कमी कालावधीत आकर्षित फुलांचे उत्पादन निघू लागले पण नव्या फुलांना पहिल्यासारखा सुगंध नाही. नव्या तंत्रज्ञानात फुलांचा सुगंध हरवत चालला आहे.
यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतक-यांनी पदरमोड करून टँकरने पाणी देऊन फुले जगवली. यावर्षी ५० टक्के फुलउत्पादक शेतक-यांनी शेततळे उभारल्याने फुलांच्या शेतीला मोठा आधार झाला. यामुळे फुलांना वेळेत पाणी मिळू शकले. - रघुनाथ शेळके, शेतकरी
यंदा फुलांच्या नव्या व्हरायटी आल्याने प्रथमच गणेशोत्सव व मोहरमसाठी फुले उपलब्ध झाली आहेत. लागवड झाल्यांनतर ९० दिवसात फुले येण्याच्या व्हरायटीचा हा परिणाम आहे. - आनंद भोर, फुलउत्पादक शेतकरी