पाचवीत असताना मी सातवीच्या वर्गाला गणित शिकवलं; आठरे, कुलकर्णी गुरूजींनी दिला विश्वास; माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:41 AM2020-09-05T11:41:50+5:302020-09-05T11:46:31+5:30
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी दिलेले धडे कामी आले. त्यामुळेच खेडेगावातील एका मराठी शाळेतील विद्यार्थी दोन-दोन विद्यापीठांचा कुलगुरू होऊ शकला, अशा शब्दांत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी शिक्षकांचा गौरव केला.
शिक्षक दिन विशेष
चंद्रकांत शेळके ।
अहमदनगर : नगर तालुक्यातील मांडवे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झालं. शाळेला इमारत नव्हती. पत्रे उडालेले. अशा स्थितीत आठरे गुरूजी व कुलकर्णी गुरूजी हे दोघेच सातवीपर्यंत शिकवत होते. दोघा शिक्षकांनी शिकवलेलं गणित पुढे आयुष्यभर कामी आलं. त्या शिक्षकांमुळे एवढा आत्मविश्वास वाढला की मी पाचवीत असतानाच सहावी व सातवीतील मुलांना गणित शिकवत होतो. हीच शिदोरी घेऊन आयुष्यात गणिताचा प्राध्यापक, कुलगुरू व इतर पदे मिळवता आली.
अभियांत्रिकीऐवजी गणितच निवडले
पुढे दहावी कोपरगावला केली. तेथे आर. जी. कोºहाळकर या शिक्षकांमुळे गणित आणखी वृद्धिंगत झाले. अकरावी पुन्हा नगरमध्ये दादा चौधरी विद्यालयात झाली. तेथे स. वि. हातवळणे सरांनी घडवले. सन १९६७ ते ७१ मध्ये नगर कॉलेजमधून बीएस्सी पूर्ण केले. खरं तर त्यावेळी अभियांत्रिकीला जाण्याची मोठी संधी होती. परंतु गणितात ंरूची असल्याने पुढे पुणे विद्यापीठात एमएस्सी (गणित) पूर्ण केले. पुणे विद्यापीठात राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षकांचा सहवास लाभला. त्यावेळी पुणे विद्यापीठात जगभरातून शिक्षकांना मागणी होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षणही जवळून पाहता आले.
प्राध्यापक ते कुलगुरू
पदवीनंतर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेत १९७५ ला गणिताचा प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. २००४मध्ये तेथेच प्राचार्यपदाची संधी मिळाली. या काळात अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठातील सर्वच अधिकार मंडळावर काम केले. या सर्वांचा परिणाम २००८-१३ स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व २०१३-१६ मध्ये लखनौ विद्यापीठात कुलगुरूपदाची संधी मिळाली.
गावातून येऊन शहरी शाळेत नंबर...
सातवीपर्यंत मांडवे गावात शिक्षण झाल्यानंतर आठवीला नगरमधील न्यू इंग्लिश स्कूलला प्रवेश घेतला. आम्हाला सातवीपर्यंत इंग्रजी नव्हतं. परंतु न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीपासूनच इंग्रजी असल्याने तेथील मुलांना इंग्रजीची ओळख होती. मला आठवीत एबीसीडीही माहीत नव्हती. परंतु तरीही माझ्या आधीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन व स्वअध्ययनामुळे आठवीत मी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. त्यातून मोठा आत्मविश्वास निर्माण झाला.
जीवनाला दिशा देण्यात व आपली जडणघडण करण्यात गुरूंचा वाटा महत्वाचा असतो. जगात शिक्षकांना व त्यातही भारतीय प्राध्यापकांना मानाचे स्थान आहे.
- डॉ़ सर्जेराव निमसे, माजी कुलगुरू.