‘अयोध्येत गेले, तेव्हा वाटले राम मंदिर बांधूनच परत येतील!’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:01 AM2019-01-21T04:01:47+5:302019-01-21T04:02:09+5:30
अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील.
अहमदनगर/शिर्डी : अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील. मात्र गेले आणि लगेच परत आले, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला़ फेब्रुवारी महिन्यात घोषणांचा पाऊस पडणार आहे. या पावसात लोक वाहून जातील याची भीती वाटत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी येथे केली.
चव्हाण म्हणाले, सध्या सरकारकडून दररोज एक घोषणा केली जात आहे़ निवडणूक संपल्यावर हा ‘चुनावी जुमला’ होता असे सांगितले जाईल. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला माझा विरोध नाही़ ही युती होत असेल तर त्याला विरोध नसल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात रोज पाच-सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार याची दखल घेण्यास तयार नाही़ पंतप्रधान मुंबईत येतात आणि सिनेमातील लोकांना भेटतात. मात्र शेतकऱ्यांना भेटावे असे पंतप्रधानांना कधी वाटत नाही़ कांद्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकत आहेत़ शासनाची कर्जमाफी पूर्णपणे शेतकºयांना मिळाली नसून ही फक्त कागदावर राहिलेली असल्याचा आरोप त्यांनी केला़
> काँग्रेसची बदनामी
‘अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र हा चित्रपट काढून काँग्रेसला बदनाम करण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट आला. लोकपाल नियुक्ती झाली पाहिजे, याबाबत काँग्रेसने लोकसभेत आपली भूमिका मांडली आहे. सर्वोच्च न्यायलयात प्रबळ बाजू न मांडल्यानेच डान्स बारला सूट मिळाल्याचे ते म्हणाले.