अकोल्यात मामलेदार मारला तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:38 AM2018-08-05T11:38:57+5:302018-08-05T11:39:05+5:30

१९१८ सालचा तो १० आॅगस्टचा दिवस होता. वार शनिवार म्हणजे अकोल्याच्या बाजारचा दिवस. अकोल्याच्या पंचक्रोशीतील व आदिवासी भागातील चार-पाच हजाराचा समुदाय अकोल्यात जमा झालेला. या जमावाने त्यावेळच्या जुलमी मामलेदाराला कु-हाडी, काठ्यांचे घाव घालून ठार मारले. या घटनेला येत्या १० आॅगस्ट रोजी १०० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने...

When a person killed Akolat ... | अकोल्यात मामलेदार मारला तेव्हा...

अकोल्यात मामलेदार मारला तेव्हा...

शांताराम गजे

१९१८ सालचा तो १० आॅगस्टचा दिवस होता. वार शनिवार म्हणजे अकोल्याच्या बाजारचा दिवस. अकोल्याच्या पंचक्रोशीतील व आदिवासी भागातील चार-पाच हजाराचा समुदाय अकोल्यात जमा झालेला. या जमावाने त्यावेळच्या जुलमी मामलेदाराला कु-हाडी, काठ्यांचे घाव घालून ठार मारले. या घटनेला येत्या १० आॅगस्ट रोजी १०० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने...
१९१४ साली युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले होते. ब्रिटिशांची साम्राज्यशाही टिकविण्यासाठी हिंदुस्थानातून तिकडे मदत सुरू होती. लढण्यासाठी सैनिक, दारूगोळा, धान्य, कपडा, पैसा याचा ओघ हिंदुस्थानातून सुरू झाला. त्यासाठी प्रचंड रकमेचे वॉर लोन (युद्ध कर्ज) जाहीर करण्यात आले. गावागावातून सक्तीची सैनिक भरती आणि वॉर लोनची वसुली सुरू झाली. नोकरशाहीच्या हाती आयतेच कोलित चालून आले. ते जनतेची, व्यापाऱ्याची पिळवणूक करू लागले. १९१८ साली नगर जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. याचबरोबर गावागावात मेंदूज्वराची (मानमोडी) साथ चालू होती. तिने हजारो लोकांचा बळी घेतला होता. त्यात पाटील, तलाठी व इतर अधिकारी जबरदस्तीने वॉर लोन वसूल करत होते. त्यांच्याविरुद्ध तालुक्याच्या मामलेदाराकडे तक्रार करण्याचीही सोय नव्हती. कारण चाललेला प्रकार मामलेदारांच्या आदेशाप्रमाणे सुरू होता. दुष्काळ, रोगराई इकडे दुर्लक्ष करून कोणत्याही मार्गाने वॉर लोन वसूल करण्याचा अकोल्याचे मामलेदार पीरजादेसाहेब (काझीसाहेब किंवा खानसाहेब म्हणूनही ते परिचित होते) यांचा सक्त आदेश होता.
या पीरजादे मामलेदाराला सत्तेचा कैफ चढला होता. त्याचे कोर्ट प्रवरा नदीवर, पाटील पाणवठ्यावर भरे़ तेथे खटले चालत. मन मानेल तशा व मन मानेल तेथे तारखा दिल्या जात. खटल्याचे कामकाज चालू असताना साहेबांचे मासे पकडायचे आवडते कामही चालू असे़ खटला ऐकता ऐकता मासा गळाला लागला की मग पट्टेवाला व मुन्सब याची धावपळ होई. साहेबांच्या मनात येईल तेव्हा खटल्याचे कामकाज तत्काळ तहकूब करण्यात येई.
वॉर लोन वसुलीसाठी मामलेदारांचे तालुक्यात दौरे होत असत. खेड्यावर मुक्काम पडे. खेडुतांना, आदिवासींना दमदाटी करण्यात येई. याला दाद ना फिर्याद! साहेबांचा मुक्काम जेव्हा खेड्यातून हले, तेव्हा त्यांना भेट म्हणून कोंबड्या देण्यात येत. मामलेदारसाहेब तालुक्याच्या गावी सिद्धेश्वर मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या हरीभाऊ भाटे यांच्या दोन मजली वाड्यात राहात असत (सध्या तेथे मॉडर्न हायस्कूल या विद्यालयाचे खेळाचे मैदान आहे). वाडा ऐसपैस़ दोन चौक असलेला. वाड्याच्या पिछाडीला विहीर होती. सभोवती आंब्याची झाडे. वाड्याचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे होता. समोरच नारळीची बाग. तेथे असलेल्या वाड्यात कहार नावाचा फौजदार राहात असे. तर मामलेदार राहात असलेल्या वाड्याच्या पश्चिमेला शेजारी समांतर असा श्रोत्री मास्तरांचा वाडा होता. अगस्ती ऋषीच्या आश्रमाकडे जाणा-या रस्त्याला लागून हा मामलेदारांचा वाडा होता. आश्रमाकडे जाणारे-येणारे लोकही या वाड्याजवळून जाताना भीत भीतच जात. असा या खानसाहेबांचा दरारा होता. या वाड्याच्या आसपास मामलेदाराच्या शे-दीडशे कोंबड्या मोकाट चरत असत. त्यांनी कोठेही अंडी घातली तर ती वाड्यात पोहचविणे म्हणजे आसपासचे लोक परम कर्तव्य समजत.
मामलेदाराचा व त्याच्या हाताखालच्या लोकांचा असा जुलूम जनतेवर चालू होता. पोलीस अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत होते. मग लोकांनी तक्रारी स्थानिक कार्यकर्त्यांकडे सांगण्यास सुरुवात केली. मामलेदाराची पापे रोजच वाढत होती. कार्यकर्ते या मुद्यावर एकत्र येत होते. अकोल्याचे गणेश जगन्नाथ जोशी यांच्या नेतृत्वाखाली गुप्त बैठका, खलबते सुरू झाली. नवलेवाडी, धमाळवाडी ही गावे आघाडीवर होती. तुळशीराम गंगाराम माळी, बाळा तुकाजी धुमाळ, दगडू राघू धुमाळ, सहादू गंगाराम माळी, विठोबा गंगाराम माळी, गोपाळा बाळ धुमाळ, हरिभाऊ धुमाळ, नारायण झोळेकर, कोंडाजी राघू वर्पे, नरसू सहादू नवले, परसू सहाद ूनवले,गणपत नावाजी, हुसेन मुसलमान, नाना गंगाराम दातखिळे, बजा ठाकर, दगडू रावजी माळी, प्रभू बाळाजी नवले, तुक्या भिल्ल या प्रमुख कार्यकर्त्यांनी मामलेदाराला या जगातून नाहीसा करण्याची जबाबदारी शिरावर घेतली.
मामलेदाराच्या पापांचे शंभर घडे भरले होते. याचवेळी एक ताजी घटना घडली. मामलेदाराचे कोर्ट नदीवर चालू होते. त्याचवेळी १०-१२ गोसावी अगस्ती आश्रमाकडे जाताना साहेबांना दिसले. दुस-या दिवशी साहेब पोलीस पार्टीसह आश्रमात दाखल झाले. त्यांनी सर्व गोसाव्यांना पकडून अकोल्याच्या पोलीस ठाण्यात आणले. त्यांना बºया बोलाने सैन्यात भरती होण्यास सांगण्यात आले. साधू काही तयार होईनात़ मग मामलेदाराने एक-दोघा साधूंच्या दाढ्या व जटा भादरल्या आणि त्या सर्व साधूंना त्यांचा कोणताही गुन्हा नसताना लॉकअपमध्ये ठेवून दिले. बोल बोल करता सा-या तालुकाभर ही बातमी पसरली. लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. त्यातच त्या साधूच्या तोंडात बळजबरीने मासे कोंबल्याच्याही बातम्या उठल्या. हे मासे अगस्तीच्या पवित्र कुंडातले होते, असेही सांगण्यात आले. वरील क्रांतीकारकांना ही संधी चालू आली. एका आठवड्यात त्यांनी नियोजन पूर्ण केले.
१९१८ सालचा तो १० आॅगस्टचा दिवस होता. वार शनिवार म्हणजे अकोल्याच्या बाजारचा दिवस. अकोल्याच्या पंचक्रोशीतील व आदिवासी भागातील चार-पाच हजाराचा समुदाय अकोल्यात जमा झालेला़ दिवस बाजारच्या गर्दीचा असल्यामुळे त्याची दखल घेतली नाही. सुमारे दोनशे कार्यकर्त्यांचे तीन-चार गट करण्यात आले. त्यापैकी एक गट कचेरीवर चालून गेला. तेथे मामलेदार किंवा फौजदार नव्हते. पोलिसांना दम देण्यात आला. बाहेर न येण्याचा सल्ला देण्यात आला. कचेरीच्या फाटकाला कुलूप लावून हा गट बाहेर थांबून राहिला. दुस-या गटाने कोल्हार-घोटी रस्त्यावर झाडे पाडून दगड टाकून जागोजाग रहदारीस मोठा अडथळा निर्माण केला. याच गटाने रस्त्याच्या कडेच्या पोस्टाच्या ताराही तोडून टाकल्या. अशा प्रकारे चोहोकडून बंदोबस्त झाल्यावर, मुख्य गट आणि मोठा जनसमुदाय मामलेदाराच्या वाड्यावर चालून गेला. त्यांनी वाड्याला वेढा घातला. मामलेदाराला बाहेर येण्याच्या घोषणांनी परिसर निनादून गेला.
दरम्यान, मामलेदाराचे नोकरचाकर, बायको, मुलगी यांना सुरक्षित बाहेर काढले गेले़ त्याची बायको लोकांना विनवीत होती. परंतु काहीही ऐकण्याच्या स्थितीत जमाव नव्हता. गफुरभाई काझी यांनी मामलेदाराच्या बायकोला आपल्या घरी सुरक्षित नेले.
याच वेळेला दुपारी १२ च्या सुमारास एक गट नारळीच्या बागेतील फौजदाराच्या वाड्यावर गेला. त्याची पत्नी बाहेर येऊन लोकांपुढे पदर पसरू लागली. पतीला जीवदान मागू लागली. ती म्हणाली, ‘‘आम्ही जातीचे कहार आहोत. नोकरीचा राजीनामा देऊ, कोठेही मोलमजुरी करू, परंतु आम्हाला जीवदान द्या.’’ तेथील लोकांनी ते मान्य केले व त्याला घरात कोंडून काहीही गडबड न करण्याची तंबी दिली.
इकडे मामलेदाराच्या रोमारोमात सत्तेची मस्ती भरलेली होती. जमाव बघून शरण जाण्याऐवजी त्याने जमावाला धडा शिकवण्याचे ठरविले. तो रस्त्याचा बाजूच्या सज्जात आला आणि जमावावर बंदूक रोखली. बंदूक दोनबारी होती. एक गोळी उडून जमावातील एक जण (रावजी यादव, रा़ शेलद, ता़ अकोले) जागीच ठार झाला. मात्र दुसरा चाप ओढताना तो अडकला. दुसरी गोळी उडालीच नाही. मग तो तळघरात दडून बसला. आत शिरलेल्या लोकांना तो काही सापडेना़ मग मागच्या बाजूने जमावाने वाडा पेटवून दिला. सागाची लाकडे ढणाढणा पेटू लागली. परिसरात धूर झाला. आता दिवस मावळण्याच्या बेतात आला होता. लोकांना मामलेदार काही सापडत नव्हता. दरम्यान मामलेदाराने वाड्याचा आसरा घेतला. मात्र असे करताना कुणाला तरी तशी शंका आली. मग काही निवडक मंडळी श्रोत्री मास्तरांच्या वाड्यावर चढली. कौले काढून आत प्रवेश मिळवला. हातात कंदील व टेंभे होते. अंधार पडला होता. बाहेरचा जमाव पांगू लागला होता. इतक्यात एका कापसाच्या गंजीत काही हालचाल जाणवली आणि रात्री ९ ते १० च्या सुमारास मामलेदार हाती लागला. पाया पडू लागला. हरप्रकारे विनवणी करू लागला. त्याला वाड्याच्या बाहेर असलेल्या ओट्यावर ओढीत आणले गेले. तुक्या भिल्ल याने त्याच्या डोक्यावर कु-हाडीचा घाव घातला. मग काठ्या, कुºहाडीचे घावावर घाव त्या राक्षसाच्या शरीरावर पडू लागले. त्याचे शरीर रक्ताने न्हाऊन गेले. रस्त्यावर वाड्यातून लाकडे आणली. ती मामलेदाराच्या टांग्यात टाकली. त्यावर त्याचे प्रेत ठेवले व टांग्यासह लाकडे पेटवून रातोरात जमाव पांगला.
अकोल्यातील व्यापा-यांनी त्यांच्या घरापुढे या दिवशी शेंगदाणे, खोबरे, खारका याचे ढीग ठेवले होते. झालेल्या घटनेने तेही भयभीत झाले होते. घरात लक्ष जाण्याऐवजी घराबाहेरील खाण्याच्या वस्तूवरच जमाव तुटून पडावा, असा त्यांचा होरा असावा.
मात्र या घटनेत इतर कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. घटनेनंतर दोन दिवसांनी पोलीस कुमक आली. टांग्यातून लष्कर येऊ लागले. सध्या जेथे ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहे, त्या टेकडीवर नाका उभा केला. सरकारी दवाखान्यात लष्कर उतरले.

Web Title: When a person killed Akolat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.