पोशिंदा बाप गेल्याने हावश्या पोपट्याला झाले अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:13 AM2018-10-24T11:13:20+5:302018-10-24T11:13:24+5:30
वारणेच्या वाघासारखी धिप्पाड शरीरयष्टी, भरदार गर्दन, टोकदार नाक, पिळदार मिशा, छिप्पाड छाती, धिप्पाड ध्येययष्टी
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : वारणेच्या वाघासारखी धिप्पाड शरीरयष्टी, भरदार गर्दन, टोकदार नाक, पिळदार मिशा, छिप्पाड छाती, धिप्पाड ध्येययष्टीला शोभेल असा डोक्यावर फेटा, घोड्यावरून चिखलीच्या डोंगरात भटकंती करणारे चिखलीचे सदाशिव सिताराम बुलाखे (वय९०) यांनी आपल्या आवडत्या हावश्या आणि पोपट्या या बैलाच्या सानिध्यात आपला देह ठेवला. आपला पोशिंदा बाप सोडून गेल्याचे पाहून हावश्या आणि पोपट्याला अश्रू अनावर झाल. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
निसर्गाच्या सानिध्यात राहून काळ्या आईशी इमान राखून, शेळ्या, मेंढ्या, जनावरे यांना कामधेनू मानून, रात्रंदिवस काळ्या आईचे व या कामधेनूंच रक्षण करणारा परिसरातील सात गावातील सर्व लोकांशी प्रामाणिक राहून, विनोदाने हास्यकल्लोळ करणारे दलित समाजातील सदाशिव बुलाखे . त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण होती. कसल्याही प्रकारचा डॉक्टर नाही, दवाखाना नाही. सतत निसर्गाच्या सान्निध्यात. मरणाच्या दिवशी घोड्यावर स्वार होऊन तलुलीच्या पठारावर हुलग्याचे राखण करण्यासाठी गेले होते.
आपले श्रद्धास्थान म्हसोबाजवळ त्यांचे ‘हावश्या’ आणि ‘पोपट्या’ ही जीवाभावाची बैलजोडी बरोबर होती. सदाशिव बुलाखे यांना तिथच हृदयविकाराचा झटका आला. धिप्पाड शरीरयष्टीचा मालक जमीनीवर कोसळला. हावश्या अन पोपट्याचा जीव कासावीस होऊ लागला. कासावासीमुळे मोठ्याने ओरडू लागले. बुलाखे परिवार उपस्थित होईपर्यत हावश्या पोपट्याच्या डोळ्यातून दु:खाचे अश्रू थांबत नव्हते.