कधी थांबणार शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:35+5:302021-08-20T04:26:35+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेमधील विषय समित्यांच्या बैठका एक महिन्याच्या आत घेणे बंधनकारक असताना गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शिक्षण समितीची ...
अहमदनगर : जिल्हा परिषदेमधील विषय समित्यांच्या बैठका एक महिन्याच्या आत घेणे बंधनकारक असताना गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शिक्षण समितीची समक्ष बैठक झालेली नाही. तुरळक बैठका झूम मार्फत ऑनलाईन घेण्यात आल्या. परंतु त्यात अनेक अडथळे होते. शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे तातडीने या समितीची प्रत्यक्ष बैठक घ्यावी, असा आरोप जि. प. सदस्य तथा भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.
ऑनलाईन मीटिंग ही सुद्धा एक फसवणूक आहे. त्यात एक तर आवाज येत नाही. नेटवर्क व्यवस्थित राहत नाही. आता कोरोना कमी होऊन दोन महिने होत आले तरी शिक्षण समितीची बैठक झालेली नाही. बाकी सर्व विषय समित्यांच्या बैठका वेळेवर होतात. परंतु शिक्षण विभाग हा जिल्ह्याचा महत्त्वाचा विषय असून त्याकडे मात्र अधिकारी-पदाधिकारी मुद्दाम दुर्लक्ष करतात. शिक्षण विभागाचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा विषय किंवा पोषण आहार, ऑनलाईन शिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा, आदर्श शिक्षक पुरस्कार, आरोग्य विषयक समस्या अशा अनेक विषय असताना शिक्षण समितीची बैठक नेहमीच पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षण विभागात प्रचंड मोठा अनागोंदी कारभार चालू आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांनी रिक्त जागा भरून खोट्यानाट्या मागच्या तारखा दाखवून अनेक शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली, तर मागच्या तारखा दाखवून फरकाच्या मोठ्या रकमा संस्थाचालक व अधिकारी यांनी मिळून लाटल्या आहेत. त्यामुळे या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर प्रत्यक्ष समितीची बैठक घ्यावी. अन्यथा आम्ही आयुक्त व शिक्षण संचालक यांच्याशी पत्रव्यवहार करून किंवा समक्ष भेटून या बैठका का होत नाही, याचा जाब विचारू, असे वाकचौरे यांनी निवेदनात म्हटले आहे.