नगरला अच्छे दिन कधी येणार?
By Admin | Published: August 8, 2014 11:47 PM2014-08-08T23:47:31+5:302014-08-09T00:23:36+5:30
असुरक्षिततेचे भूत मानगुटीवर बसल्याने इथला विकास पार खड्ड्यात गेला आहे.
अहमदनगर : लोकप्रतिनिधी असो की अधिकारी... प्रत्येक जण येतो आणि नगरच्या विकासाविषयी कळवळून बोलतो. कोट्यवधी रुपयांच्या निधीचे गाजर दाखवित आश्वासनांची उड्डाणे येथे रोजच होतात, तरीही विकासाचे विमान जमिनीवरच आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते, तर शहराला विकासापासून वंचित ठेवण्यातच इथले राजकारण फिरते आहे. स्वातंत्र्य मिळाले, मात्र असुरक्षिततेचे भूत मानगुटीवर बसल्याने इथला विकास पार खड्ड्यात गेला आहे.
अहमदशहानंतर थेट नवनीतभाई बार्शीकरांनी नगरचा विकास घडविल्याची साक्ष दिली जाते. उद्याने, रुग्णालये, तलाव, एम.आय.डी.सी., रस्ते, पाणी या काही साऱ्या मूलभूत सोयी-सुविधा बार्शीकरांच्या काळात झाल्या. नगरपालिकेची महापालिका झाली. कधी निधीचे, तर कधी विरोधी पक्ष असल्याचा कांगावा करीत नगर विकास विन्मुख झाले. ‘चाँदबिबी आली तरी तिला सरळपणे तिचा महाल सापडेल’, असे नगरच्या विकासाविषयी नेहमी बोलले जात असले तरी एवढे नगर मागासलेले राहिले नाही. रस्ते झाले, इमारती उभ्या राहिल्या, व्यवसाय वाढले, वाहने वाढली, पैसाही लोकांकडे आला. पण ज्याने त्याने वैयक्तिक हिमतीवर हा विकास केला आहे. नाशिक-पुणे-मुंबई-औरंगाबाद या चतुष्कोनात राहण्याचा बहुमान नगरला मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नगर मागेच राहिलेले आहे. शिर्डी, शिंगणापूर, भंडारदरा असे धार्मिक-पर्यटनदृष्ट्या नगर जगभरात पोहोचले असले तरी या शहराचा चेहरा ओबडधोबड ठेवण्यातच जनता धन्य झाली आहे. नगर राजकारणाच्या फेऱ्यातून विकासाकडे कधी झुकणार? की तसेच राहणार? दक्षिण व उत्तरेच्या मध्यावर केवळ राजकारणाचा पट असणाऱ्या नगरला अच्छे दिन कधी येणार? याचीच प्रतीक्षा आहे.
(प्रतिनिधी)