मांडवगणला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:07+5:302021-01-09T04:17:07+5:30
मांडवगण : सध्या नेमणुकीस असलेल्या ग्रामसेवकाकडे मांडवगण (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातून दोनच दिवस येतात. ...
मांडवगण : सध्या नेमणुकीस असलेल्या ग्रामसेवकाकडे मांडवगण (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातून दोनच दिवस येतात. त्यामुळे गावगाड्यातील अनेक कामे ठप्प झाली असून, गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक कधी मिळणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. मांडवगण येथील ग्रामसेवकपद रिक्त आहे. त्यामुळे येथील अतिरिक्त पदभार मागील पाच महिन्यांपासून तरडगव्हाण व थिटेसांगवीचे ग्रामसेवक डी. आर. वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांची ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात आहे, असे पंचायत समिती स्तरावरून सांगण्यात आले होते. हे तात्पुरते भाऊसाहेब आठवड्यातून अवघे दोनच दिवस येतात. इतर दिवस ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवकाविनाच चालतो. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्वतंत्र व पूर्णवेळ ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करणाची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली आहे. मोठ्या गावाला स्वतंत्र कार्यभार असलेले ग्रामसेवक गरजेचे असताना येथे मात्र टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते.
-----
उपसभापतींच्या गावाला मिळेना ग्रामसेवक
पंचायत समितीच्या उपसभापती रजनी देशमुख या मांडवगण येथील आहेत. त्यांच्याच गावाला स्वतंत्र कार्यभार असलेले कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.