...जेव्हा सायकल यात्रेतील तरुण करतात गोदामाईची स्वच्छता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:58+5:302020-12-22T04:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : येवला ते गाणगापूर सायकलवर पर्यावरणाचा संदेश देत निघालेली यात्रा कोपरगाव शहरातील गोदावरी नदीपात्रात येते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : येवला ते गाणगापूर सायकलवर पर्यावरणाचा संदेश देत निघालेली यात्रा कोपरगाव शहरातील गोदावरी नदीपात्रात येते आणि अचानक गोदामाईच्या पात्राची स्वच्छता करू लागते. काही वेळातच नदीपात्राची स्वच्छता करून वृक्षारोपणही केले जाते. कोणतेही आवाहन न करता थेट नदीपात्राची स्वच्छता व वृक्षारोपण करून या सायकलवारीतील सेवकांनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. निमित्त होते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे ! हा उपक्रम रविवारी (दि.२०) राबविण्यात आला.
कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या संकल्पेनेतून व येवला तालुक्यातील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रसंत गाडगे महाराज हे ज्या गावात जातील, तेथील ते स्वच्छता करीत आणि नंतर इतरांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत. अगदी त्याच पद्धतीने या सायकलवारीतील सेवकांनी अगोदार स्वत: गोदामाईची स्वच्छता व वृक्षारोपण करून गाडगे महाराजांना अभिवादन केले. तसेच इतरांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
जय भवानी या संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून येवला - तुळजापूर - अक्कलकोट - गाणगापूर असे सायकल यात्रेचे नियोजन केले जाते. या सायकल यात्रेदरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाचे हे १५वे वर्ष असून या यात्रेला रविवारी (दि. २०) सुरुवात झाली आहे. एकूण सात दिवसांचा प्रवास आहे. यात्रेदरम्यान सायकलवरून दररोज ७० किलोमीटरचा प्रवास ते करत आहेत.
यावर्षी सायकल यात्रेमध्ये महिला सायकलपट्टू पूजा आव्हाड यांच्यासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोरकडे, किशोर खोकले, नवनाथ भोरकडे, किरण खोकले, गोरख घोटेकर, विक्रम आव्हाड, सतीश दिघे, गणेश भोरकडे, गणेश मोरे, वासुदेव साळुंखे, सचिन कुटे, मनीष खोकले, नितीन कोकाटे, गोरख घोटेकर, विवेक लगड, अरुण खोकले, वैभव मोरे, कैलास सलमुठे, गणेश सोमासे, विशाल शिंगाडे, कारभारी भोरकडे, प्रभाकर डुंबरे, लक्ष्मण बनकर, अमोल महाले, सचिन भोसले व भिकन सोनवणे आदी २७ जणांनी सहभाग घेतला आहे.
.............
यंदा कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सदृढ ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम व सायकलिंग करून आपण आरोग्य सदृढ ठेवू शकतो, असा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश यंदाच्या सायकल यात्रेचा आहे.
-विक्रम आव्हाड, सायकल यात्री
..................
फोटो२१- सायकल यात्री, कोपरगाव