जिल्ह्यात नववीतील दीड हजार विद्यार्थी गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:35+5:302021-06-17T04:15:35+5:30
अहमदनगर : नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळत ...
अहमदनगर : नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळत असल्याने नववीतील हे विद्यार्थी गेलेे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी नववीतून शाळा सोडली की त्यांचे परजिल्ह्यात स्थलांतर झाले याची माहिती समोर आलेली नाही.
यू-डायसच्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ८१ हजार २०० विद्यार्थी नववीत होते. शासन निर्देशानुसार पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण गृहीत धरले जातात. यातून सीबीएसई बोर्डाचे ६ हजार ४९१ विद्यार्थी वजा केले तरी उर्वरित ७४ हजार ७०९ विद्यार्थी दहावी वर्गात जाणे अपेक्षित होते; परंतु पुढील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नगर जिल्ह्यातून ७३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेला होता. म्हणजे यात १५७० विद्यार्थ्यांची तफावत आढळून येते. त्यामुळे नववीतून दहावीत न आलेले हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी नववीतूनच शाळा सोडली का, ते इतर जिल्ह्यांत स्थलांतर झाले का, किंवा त्याला आणखी काही कारणे आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.
-----------
जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी - ७४७०९
दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी - ७३१३९
---------------
पटसंख्येचा घोळ
नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधल्या काळात शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी तसे दाखिवले जात नाही. तो रेकाॅर्डवरच असतो; परंतु दहावीसाठी अर्ज करताना हा विद्यार्थी प्रत्यक्षात नसतोच. अशीही काही उदाहरणे आहेत. परिणामी दहावीत विद्यार्थिसंख्या आपसूकच कमी भरते, असेही काही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-------------
शासनाच्या निर्देशानुसार पहिलीपासून नववीपर्यंत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण केले जातात; परंतु दहावीत अभ्यास करूनच उत्तीर्ण व्हावे लागते. काही विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी न झाल्याने ते दहावीचा परीक्षा अर्ज भरत नाहीत. काही मुलींचे विवाह होतात, काही इतर जिल्ह्यांत जातात किंवा कामगारांच्या मुलांचे स्थलांतर होते. या कारणांमुळे दहावीत हे विद्यार्थी कमी दिसतात.
- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ
-------
नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात काही प्रमाणात तफावत आहे. त्याची काय कारणे आहेत, याचा शोध घेतला जाईल.
- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक