१० हजारांची लाच घेताना खारेकर्जुनेच्या तलाठी, कोतवालास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:35 PM2018-11-01T14:35:34+5:302018-11-01T14:36:12+5:30
वाळूचा पकडलेला डंपर सोडण्यासाठी १० हजारांची लाच घेताना खारेकर्जुने (ता. नगर) येथील तलाठी व कोतवालास गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
अहमदनगर : वाळूचा पकडलेला डंपर सोडण्यासाठी १० हजारांची लाच घेताना खारेकर्जुने (ता. नगर) येथील तलाठी व कोतवालास गुरूवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
अशोक बबन गाडेकर हे खारेकर्जुने येथे तलाठी म्हणून, तर विकास गारगुंड हा कोतवाल म्हणून कार्यरत आहे. या तलाठ्याने वाळूचा एक डंपर पकडला होता. त्यावर कारवाई न करता तो सोडण्यासाठी तलाठ्याने डंपरचालकाकडे ३० हजार रूपयांची मागणी केली. अंतिमत: १० हजार रूपये देण्याचे ठरले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे डंपरचालकाने तक्रार केली. डंपरचालकाने तलाठ्यास कळवून पैसे आणल्याचे सांगितले. तलाठ्याने हे पैसे कोतवालाकडे देण्यास सांगितले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास खारेकर्जुने येथे सापळा लावून कोतवाल गारगुंड यास १० हजारांची रक्कम स्वीकारताना पकडले. तलाठी गाडेकर हा कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. त्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले.