वाटा आनंदाच्या धुंडाळताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 05:01 PM2020-02-15T17:01:52+5:302020-02-15T17:02:27+5:30

नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जातात आणि मग त्यांच आयुष्य सगळ्या चिंता आणि काळजीने काळवंडतं. म्हणून आयुष्याला नवी झळाळी देताना जे विचार विविध नात्यांच्या भोव-यात वागण्याचे भान देतात. त्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद महोत्सव साजरा करू शकतो.

While seeking share happiness | वाटा आनंदाच्या धुंडाळताना

वाटा आनंदाच्या धुंडाळताना

चिंतन-पंडित वाघोरे / 
माणसाचं आयुष्य वेगवेगळ्या घटनांनी प्रभावित होतं. मनुष्य दु:ख जास्त लक्षात ठेवतो, पण आनंदाचं चांदणं टिपायला विसरतो. माणसाच्या आयुष्याचा प्रवास निरंतर चालत असतो. मग प्रत्येक दिवसागणिक कमी होणारं आयुष्य जगावं तरी कसं ? असा केविलवाणा सवाल काही लोक करतात. नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जातात आणि मग त्यांच आयुष्य सगळ्या चिंता आणि काळजीने काळवंडतं. म्हणून आयुष्याला नवी झळाळी देताना जे विचार विविध नात्यांच्या भोव-यात वागण्याचे भान देतात. त्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद महोत्सव साजरा करू शकतो.
आनंदी विचारांची सुरुवात म्हणजे आयुष्याची नवी पहाट. ज्यात तुमच्यात असलेल्या भक्कम बाजूवर लक्ष केंद्रित करायचं, दुबळी बाजू शोधून काढायची.  समोर असलेल्या संधीचं मूल्यमापन करायचं. असलेल्या धोक्याबाबत काळजी घ्यायची. मग सुरु होईल आयुष्याचा रंजक प्रवास. स्वत: ज्ञानी होणं ही स्वयंसुधारणेची सुरुवात असते. माणसं अनेक कामाचं टेन्शन घेतात. दबाव, तणाव अग्निसारखे असते. त्यापलिकडेही जाऊन तो धगधगता निखारा आहे. या निखा-यावर नियंत्रण ठेवायचं असतं. त्याची ऊब घ्यायची असते. त्याला हवा देऊन त्याचे ज्वालात रुपांतर होणार नाही, याचं भान मनुष्याने ठेवायचे असते. स्वत:ला ओळखणे ही तर यशाची गुरुकिल्ली असते. कधीकधी तर मौन सर्वोत्तम असतं. मासेमारी करणारा माशासाठी गळ पाण्यात टाकतो. परंतु तोंड बंद ठेवले तर मासाही अडचणीत येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन मनाचा आरसा असतो. तो नेहमी विचार परावर्तीत करीत असतो. कसं बोलावं हे जर कळत नसेल तर केंव्हा गप्प बसावं हे तर मनुष्याने शिकून घ्यायला हव.
‘मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण’ हे संतवचन आहे. समुद्रात मोठे जहाज प्रवास करत असते. पण जोपर्यंत समुद्राचे पाणी जहाजात शिरत नाही तोपर्यंत अथांग समुद्र डौलात प्रवास करते. तसेच नकारात्मक विचारांचा शिरकाव आपल्या मनामध्ये होऊन देऊ नका. तरच आपण येणाºया संकटांचा सामना करू शकतो. आनंदी आयुष्य जगू शकतो. माणसानं स्वत:मधील दुर्बलतेचा शोध घेतला पाहिजे. 
कवयित्री बहिणाबाई चौधरींनी मनाचं वर्णन आपल्या कवितेत सुरेख केले आहे. ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं’. माणसाचं मन असच संवेदनशील असतं. म्हणून दिवसभराच्या कटकटी, अकारण चिंता नको, फालतू विषयांना टाकून देण्याच तंत्र म्हणे मन रिकामे करायला शिकले पाहिजे. मग आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी स्थिती येईल.
परिस्थितीचं भान ठेवून माणसाने वागायला पाहिजे. अगदीच म्हणायचं झालं तर बदक जमिनीवर चालताना निवांत, शांत, निश्चिंत होऊन प्रवास करते. पण पाण्यात मात्र सतत पाय मारते. कठीण आणि नावडती कामे पुढे  ढकलू नका. त्याचे वेळेत नियोजन करून पूर्ण करा. म्हणजे तणावाला सुट्टी मिळेल. पैशाचे  नियोजन करता तसे वेळेचे नियोजन करा. दिवसाचा प्राधान्यक्रम ठरवा. आणखी एक माणसाचं लक्षात  ठेवलं पाहिजे. जगायचं पण मनाची कवाडे उघडी ठेवून. म्हणजे नव्या विकासाच्या कल्पनांना वाव मिळेल. पैशाच्या पाकिटापेक्षा मनाचा कप्पा मोठा हवा तरच खरी श्रीमंती येईन. दुसºयावर जळण्याने आपण जळू लागतो. निरुपयोगी गोष्ट विसरून जायला हवं.  सगळं लक्षात ठेवलं तर डोक्याची कचरा पेटी होईल. कुणाचेच पूर्ण अनुकरण करण्यापेक्षा सगळ्यांकडून थोडेथोडे शिकावे. माणसाकडे सिंहासारखे काळीज पाहिजे आणि कोल्ह्यासारखी चतुराई सुद्धा. मग बघा मनुष्याचे जीवन सर्वांगी सुंदर होईल !
 

Web Title: While seeking share happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.