दोन लाखांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 06:52 PM2018-07-19T18:52:19+5:302018-07-19T18:55:55+5:30
स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करू नये म्हणून दोन लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करू नये म्हणून दोन लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरूवारी दुपारी चारच्या दरम्यान जिल्हाधिकारी परिसरातील चांदणी चौकात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत भिंगार येथील स्वस्त धान्य दुकानदाराने तक्रार केली होती. भिंगार येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकानात धान्य घेऊन जाणारा ट्रक काही दिवसांपूर्वी पुरवठा विभागाने पकडला. जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार नितीन गर्जे यांनी ही कारवाई केली होती. हा ट्रक सोडावा व कारवाई करू नये म्हणून तक्रारदाराने गर्जे यांना पैसे देऊ केले. गर्जे यांनी ही कारवाई टाळण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्याचे मान्य केले. त्याचवेळी तक्रारदाराने गुरूवारी (दि. १९) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक या दरम्यान असलेल्या रस्त्यावर पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा लावला. गुरूवारी दुपारी चारच्या दरम्यान गर्जे आपल्या कारमध्ये तेथे आला. तक्रारदाराकडून दोन लाखांची रक्कम स्वीकारून तो घाईने कारमधून निघाला. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारचा पाठलाग करून चांदणी चौकात त्याला पकडले.
गर्जे हा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागात कार्यरत आहे. शहरासह जिल्ह्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमधून सुरळीत धान्यपुरवठा होतो का? ग्राहकांपर्यंत शिधा पोहोचतो का? याची पाहणी करण्याचे काम पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचे असते.