अण्णांचे मत कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 06:47 PM2019-01-10T18:47:21+5:302019-01-10T18:48:05+5:30
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्ही.व्ही. पॅट यंत्रांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत.
अहमदनगर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स व व्ही.व्ही. पॅट यंत्रांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. शुक्रवारी राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रत्यक्ष मतदान करत ही प्रक्रिया जाणून घेतली. याशिवाय नगर शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात हे शिबिर पार पडले.
येत्या दोन-तीन महिन्यांत लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स (ईव्हीएम)बरोबर व्ही.व्ही. पॅट यंत्रांचा निवडणुकीत वापर होत आहे. व्हीव्हीपॅटद्वारे आपण कोणाला मतदान केले याची माहिती होते, तशी चिठ्ठी या यंत्रातून बाहेर येते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मताची खातरजमा करता येणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेने तालुकानिहाय शिबिरे आयोजित करून या यंत्रणेविषयी जनजागृती सुरू केली आहे.
शुक्रवारी पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्हीव्हीपॅटची पाहणी केली. आपले मत योग्य त्याच उमेदवाराला जाते का, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मतदान करून या प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गणेश मरकड यांच्यासह निवडणूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे अहमदनगर शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थिनींनी या प्रक्रियेची माहिती घेतली. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष मतदान करून आपल्या मताची खातरजमाही केली. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराप्रसंगी उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. डी. पाटील, उपप्राचार्य औटी आदींसह शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.