टँकर गेले कुण्या गावा ? : साध्या वहीवर सह्या, मिरी येथील सत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:59 AM2019-05-11T11:59:57+5:302019-05-11T12:04:06+5:30
दुष्काळी परिस्थितीत टंचाईसदृश्य गावांतील वाड्या-वस्त्यांना शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सचिन नन्नवरे
मिरी : दुष्काळी परिस्थितीत टंचाईसदृश्य गावांतील वाड्या-वस्त्यांना शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु या टँकरचे वाहनचालक, मालक व सबंधित ठेकेदार हे शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले. मिरी (ता.पाथर्डी) येथील वस्त्यांवर पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय टँकरमध्ये हा प्रकार दिसून आला.
मिरी येथील गुंड वस्ती येथे पाणीपुरवठा करण्यासाठी टॅँकर (क्र. एम.एच.१५.बी.२५७) शुक्रवारी दुपारी दाखल झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्या वाहनासोबत प्रवास केला. टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. ग्रामस्थांच्या व अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी वाहनाच्या दर्शनी भागावर व इतर कुठेही पाणीपुरवठा करण्याविषयीचे माहितीफलक लावलेले नव्हते. तसेच लॉगबुकही नव्हते. एका साध्या वहीवर नोंदी घेऊन चार-पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा समितीच्या महिलांच्या सह्या एकाचवेळी घेण्यात येत असल्याचे चालक शिवनाथ आहेर यांनी सांगितले.
सध्या मिरी गावासाठी दिवसाला दोन टँकर मंजूर आहेत. त्यातून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे आणखी दोन टँकरच्या खेपा वाढवून मिळाव्यात, असा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे पाठविला आहे. -डी.जी.सोनवणे, ग्रामविकास अधिकारी, मिरी