टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकरमध्ये भरले ‘कुकडी’चे दूषित पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:08 PM2019-05-11T14:08:47+5:302019-05-11T14:09:31+5:30
ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला. त्या टॅँकर चालकाकडे लॉगबुकही नव्हते. टॅँकरवर कोणत्याही प्रकारचा फलक नव्हता. दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टॅँकरवाल्यांवर काय कारवाई होणार? हा आता प्रश्न आहे.
नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी घोड, विसापूर, मोहरवाडी, भावडी तलाव, पेडगाव व थिटे सांगवी ही पाणी भरण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. सध्या कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळेच या टॅँकर चालकांनी नवी शक्कल लढविल्याचे दिसते. त्यांनी कुकडी कालव्यावरच डिझेल इंजिन टाकून टॅँकर भरण्याचा सपाटा सुरू केला आहे. लोणी व्यंकनाथ, बेलवंडी येथे टॅँकरचे ‘स्टिंग’ केले. प्रथम लोणी व्यंकनाथ येथे कुकडी कालव्यावर पाणी भरताना एक टॅँकर आढळला. टॅँकर चालकाकडे लॉगबुकची मागणी केली. लॉगबुक ग्रामसेवकांच्या पिशवीत असल्याचे त्याने सांगितले. परवाना फलकही त्याने लावलेला नव्हता. तुम्हाला कोठे पाणी भरण्याची परवानगी आहे, असे विचारले असता त्याची बोलती बंद झाली. हा ठेका कोणी घेतला, असे विचारले असता राळेगणसिद्धीतील पठारे यांनी घेतल्याचे त्याने सांगितले. लोणीव्यंकनाथचे ग्रामसेवक खामकर यांच्याकडे लॉगबुकची मागणी केली. ते म्हणाले, लॉगबुक कुठे आहे ते पाहावे लागेल. पण माझ्याकडे नाही.
बेलवंडी गावातही एक टॅँकर कुकडी कालव्यावरच भरताना चालक आढळला. त्याला लॉगबुक विचारले असता माने भाऊसाहेबांकडे आहे, असे सांगितले. त्या टॅँकरवरही फलक नव्हता. कुकडी कालव्यातून शासकीय टँकर भरण्यास परवानगी कोणी दिली? यावर कुकडीचे अधिकारी व बीडीओ काय कारवाई करणार? ‘लोकमत’ने व्हिडिओ बीडीओंना सादर केला आहे.
टँकर जर उद्भवाच्या ठिकाणी भरले गेले नाहीत असे आढळले तर ग्रामसेवक व ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल. एजन्सीने एप्रिल महिन्याचे बिल अद्याप जमा केलेले नाही. जीपीएस सिस्टीम तपासण्याचे काम ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा करत आहे. त्यांचा शेरा घेऊनच आम्ही बिल अदा करतो. -प्रशांत काळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती