टँकर गेले कुण्या गावा ? खेपा वाढवा, शेवगावकरांची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:38 PM2019-05-11T12:38:15+5:302019-05-11T12:38:20+5:30
दुष्काळाच्या संकटामुळे उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या मुकाबल्यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरु असलेल्या टँकरद्वारे पाणी
शाम पुरोहित
शेवगाव : दुष्काळाच्या संकटामुळे उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या मुकाबल्यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरु असलेल्या टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे सुरु असली तरी वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना टँकरसाठी चार ते पाच दिवस वाट पहावी लागते. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
तालुक्यातील वाडगाव, मुर्शदपूर परिसरात लोकमत प्रतिनिधीने पाण्याच्या टँकरचा आढावा घेतला. तसेच उपस्थित ग्रामस्थांशी त्यांच्या अडचणींबाबत संवाद साधला. यावेळी बप्पासाहेब धावणे, मीनाबाई धावणे व उपस्थित ग्रामस्थांनी वडगाव व मुर्शदपूर या दोन गावांसह नजीकच्या बिरोबावस्ती, जवरे वस्ती, गोर्डेवस्ती, लवणवस्ती, गायकवाडवस्ती, मारुतीवस्ती, थाटे रस्ता, हसनापूर रस्ता, निमगाव रस्ता, ढाकणे वस्ती अशा एकूण २४ वस्त्यांसाठी एकमेव टँकर उपलब्ध असल्याने चार-पाच दिवसांतून एकदा येतो, अशी माहिती दिली. टँकरच्या खेपा व संख्या वाढविण्याची मागणी पंचायत समितीच्या टंचाई शाखेकडे केली आहे.
यावेळी महिला सदस्या सुनीता धावणे, विमल ढाकणे, वनिता धावणे, नंदाबाई ढाकणे, कस्तुराबाई खर्चान यांनी टँकर वेळेवर येतो व लॉगबुक वर सह्या घेतल्या जात असल्याची बाब निदर्शनास आणली.