टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकर शासकीय की पवारांचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:17 PM2019-05-12T13:17:32+5:302019-05-12T13:17:37+5:30
जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही,
संतोष थोरात
खर्डा : जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही, अशा प्रतिक्रिया मुंगेवाडीतील ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिल्या.
आमच्या गावात दिवसाआड एकच टॅँकर येतो. तोही ट्रॅक्टरवर. त्यात गावाचे भागत नाही. त्यामुळे गावाची गैरसोय होते. लेकराबाळांना लांबून पाणी आणावं लागतय. तुम्हीच बघा आडात पाणी किती खोल गेलय. याची जाण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठेवायला हवी, असा संताप ग्रामस्थाने यावेळी व्यक्त केला.
‘लोकमत’ प्रतिनिधीने मुंगेवाडी, नागोबाचीवाडी येथे ‘टॅँकर’चे स्टिंग केले. येथे दोन दिवसाला ट्रॅक्टरवर जोडलेला एक टॅँकर येतो. पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. जामखेड तालुका विट उत्पादकांची वाहतूक मोटार संस्थेमार्फत मनोज जोरे हे ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत. जीपीएस नाही, ट्रॅक्टरवर कुठल्याही प्रकारचा फलक नाही, कोणत्या उद्भवावरून पाणी आणतात याची माहिती नाही. लॉगबुकही नाही. त्यामुळे खेपांच्या नोंदींचा प्रश्नच नाही. सह्या घेतल्या जात नाहीत, अशी अनियमितता येथे दिसून आली. आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करतो, असे ट्रॅक्टर चालकाने सांगितले.
पिण्यासाठी गढूळ पाणी..
टॅँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. त्यामुळे ते गढूळ होते. परंतु, नाईलाजास्तव गढूळ पाणीच प्यावे लागते. विहिरीत टाकण्याऐवजी पाणी थेट द्यायला हवे. त्यामुळे किमान गढूळ पाणी पिऊन होणारे आजार तरी होणार नाहीत, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.