टँकर गेले कुण्या गावा ? आदिवासी वस्तीत दोन महिन्यातून एकदाच टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 03:46 PM2019-05-11T15:46:55+5:302019-05-11T15:47:17+5:30
अकोले तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव मन्याळे येथील चार वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार आहे़ येथे टँकर वेळेत येतो़
मच्छिंद्र देशमुख
कोतूळ : अकोले तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव मन्याळे येथील चार वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार आहे़ येथे टँकर वेळेत येतो़ मात्र येथून जवळच असलेल्या केळीओतूर ग्रामपंचायत क्षेत्रात टँकरच्या खेपांबाबत लॉग बुकवर ग्रामसेवकाची गेल्या काही दिवसांपासून स्वाक्षरीच झालेली नाही़ त्यामुळे हा टँकर गावात जातो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे़
अकोले तालुक्यातील दक्षिण भागातील पहिले टंचाईग्रस्त गाव मन्याळेत यंदाच्या भयंकर दुष्काळात मार्च महिन्यापासून टँकर सुरू आहे. या गावात दररोज तर पिसेवाडी धराडेवाडीसाठी दिवसाआड पाणीपुरवठा होतो़ विहिरीत पाणी टाकून पाणी पुरवठा होतो . सार्वजनिक बांधकाम विभागाचा टँकर पाणीपुरवठा करत असल्याने त्यावर जीपीएस यंत्रणा नाही. मात्र लॉग बुक व्यवस्थित भरलेले आढळले तर ग्रामसेवक किशोर मांढरे यांच्या उपस्थित ग्रामस्थांना पाणीवाटप झालेले दिसले़ मात्र याच गावातील विलासनगर या आदिवासी ठाकर वस्तीवर दोन महिन्यात फक्त चार वेळा टँकर आल्याचे तुकाराम डोके या युवकाने सांगितले. बोरी पाझर तलावातून केळीओतूर, गारवाडी, डोंगरवाडी, हांडे वस्तीवर दररोज दोन खेपा होतात़ मात्र लॉगबुकवर अनेक दिवसांपासून ग्रामसेवकाची सहीच झालेली नसल्याचे समोर आले आहे. केळीओतूर येथे टँकर वेळेत पोहचत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केळीओतूर, गारवाडी, डोंगरवाडी , हांडेवस्तीच्या टँकर खेपांची चौकशी होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.