भाजपच्या उमेदवारांवर शिक्का कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:03 AM2019-10-02T11:03:33+5:302019-10-02T11:04:14+5:30

भाजपने आपल्या उमेदवारांची यादी अखेर जाहीर केली. नगर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांवर नजर टाकली तर ‘सबकुछ फडणवीस’ हेच या यादीचे विश्लेषण करता येईल. नगरला ‘हा अमूक गटाचा’ तो ‘तमूक गटाचा’ अशी राजकीय संस्कृती आहे. काँग्रेसने उमेदवार दिला तर तो थोरातांचा की विखेंचा? अशी चर्चा लगेच सुरु व्हायची. भाजपच्या यादीबाबत असा दावा कोणालाही करता येणार नाही. अमूक आमदाराचे तिकीट मी आणले, असा दावा भाजपचा एकही नेता करु शकत नाही. भाजपच्या यादीवर थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री व त्यांच्या पक्षाचाच प्रभाव दिसतो. 

Who has the stamp on BJP candidates? | भाजपच्या उमेदवारांवर शिक्का कोणाचा?

भाजपच्या उमेदवारांवर शिक्का कोणाचा?

लोकवेध / सुधीर लंके ।
भाजपने आपल्या उमेदवारांची यादी अखेर जाहीर केली. नगर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांवर नजर टाकली तर ‘सबकुछ फडणवीस’ हेच या यादीचे विश्लेषण करता येईल. नगरला ‘हा अमूक गटाचा’ तो ‘तमूक गटाचा’ अशी राजकीय संस्कृती आहे. काँग्रेसने उमेदवार दिला तर तो थोरातांचा की विखेंचा? अशी चर्चा लगेच सुरु व्हायची. भाजपच्या यादीबाबत असा दावा कोणालाही करता येणार नाही. अमूक आमदाराचे तिकीट मी आणले, असा दावा भाजपचा एकही नेता करु शकत नाही. भाजपच्या यादीवर थेट मुख्यमंत्री, पालकमंत्री व त्यांच्या पक्षाचाच प्रभाव दिसतो. 
भाजपची यादी जाहीर होण्यापूर्वी ब-याच भानगडी सुरु होत्या. राम शिंदे सोडता प्रत्येक आमदारांसमोर विघ्न होती. कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासोबत त्या मतदारसंघातून इतरही इच्छुक होते. त्यात राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांचाही समावेश होता. कोपरगावचे आशुतोष काळे हे शिवसेनेत जातील व सेना हा मतदारसंघ आपल्या कोट्यात घेईल. असे झाले तर कोल्हे यांची अडचण होऊन बसेल, अशी चर्चा होती. पण, कोल्हे यांनाच संधी देत भाजपने ही सर्व चर्चा निकालात काढली. 
शेवगाव-पाथर्डीत मोनिका राजळे यांच्या विरोधात पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत. पक्षात नसलेले काही नेतेही राजळे यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. काही गट पंकजा मुंडेंपर्यंत पोहोचले होते. मात्र, तेथेही भाजपने व मुंडे यांनी राजळे यांनाच साथ दिली. असेच चित्र नेवासा मतदारसंघात बाळासाहेब मुरकुटे यांच्याबाबत होते. मुरकुटे हे गतवेळी प्रथमच आमदार झाले. यावेळी त्यांना पक्षातून विरोध करण्यात आला. राहुरीत शिवाजी कर्डिले यांच्यासमोरील अडचणीही वाढविण्यात आल्या होत्या.  विखे व कर्डिले हे लोकसभेपूर्वी सोबत होते. पण, यावेळी विखे हे कर्डिले यांना राहुरीत मदत करणार का? अशी चर्चा उपस्थित झाली होती. सत्यजित कदम यांच्याही उमेदवारीची चर्चा सुरु झाली होती. केवळ कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या नव्हत्या. 
भाजपने या सर्व शक्यता मोडीत काढत आपल्या आमदारांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. राधाकृष्ण विखे हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनाही शिर्डीतून अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली. वैभव पिचड यांनाही दिलेला शब्द भाजपने पाळला. 
भाजपच्या यादीचे वैशिष्ट्य हे की या यादीवर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा व गटाचा शिक्का नाही. अमूक मतदारसंघाची उमेदवारी मी निश्चित केली असा दावा कोणताही नेता करु शकत नाही. ती पक्षशिस्त टिकविण्यात भाजप यशस्वी झाला आहे. विखे यांनी संगमनेर मतदारसंघात लक्ष घातले आहे. येथून विखे परिवारातील सदस्य उमेदवारी करेल असे विधान खासदार सुजय विखे यांनी केले होते. संगमनेर मतदासंघ भाजपने मागितला आहे, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, संगमनेर मतदारसंघ आजतरी शिवसेनेच्या यादीत दिसत आहे. याचा अर्थ सेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. सेनेने हा मतदारसंघ आपणाकडेच ठेवला तर विखे तेथे जास्त हस्तक्षेप करु शकत नाहीत. विखेंच्या परिवारातील सदस्यांना निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. जे राजकीयदृष्ट्या त्यांना अडचणीचे आहे. म्हणजे विखे खाली जसे भाषणात सांगत होते, तसे सेना-भाजपात वरती घडलेले नाही. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विखे समर्थकच राजळे यांच्या विरोधात भूमिका घेत होते. मात्र, त्यांची मागणी विचारात घेण्यात आलेली नाही. श्रीरामपूर मतदारसंघातही शिवसेनेने विखे यांना अंधारात ठेऊन भाऊसाहेब कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली. तेथे आज कांबळे यांचा प्रचार करायचा की नाही ? या द्वंद्वात विखे आहेत.  या सर्व बाबी विखे यांच्यासाठी धक्कादायक आहेत. विखे ठरवतील ते सेना-भाजपात घडेल अशी शक्यता यातून दिसत नाही. श्रीगोंद्यातही नागवडे परिवाराला भाजप उमेदवारीच्या मधाचे बोट दाखविण्यात आले होते. पण, बबनराव पाचपुते यांनी संधी दिल्याने नागवडे यांचा विचार झाला नाही.
भाजपमध्ये पक्ष ठरवेल त्याची अंमलबजावणी होईल, असा संदेश या सर्व उमेदवा-यांमधून दिला गेला आहे. भाजपच्या उमेदवारांवर कुणा नेत्यापेक्षा पक्षाचा शिक्का दिसतो. भाजपचे बहुतांश उमेदवार पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले आहेत. मात्र, त्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकलेला दिसतो. यात नवीन चेह-यांना मात्र संधी मिळालेली नाही. युतीने आपले चित्र जवळपास स्पष्ट केले आहे. अपवाद संगमनेरचा. तेथे सेना उमेदवारी कोणाला देणार? ही प्रतीक्षा कायम आहे. 

Web Title: Who has the stamp on BJP candidates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.