देव तारी त्याला कोण मारी..बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले विखे पाटील कुटुंबीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 04:21 PM2020-08-30T16:21:19+5:302020-08-30T16:22:53+5:30
आपल्याकडे देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या आणि त्यांचे दोन नातू मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. ही घटना शनिवारी (२९ आॅगस्ट) घडली.
लोणी : आपल्याकडे देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या आणि त्यांचे दोन नातू मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. ही घटना शनिवारी (२९ आॅगस्ट) घडली.
वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी दिली. त्याचे झाले असे..खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षांचा चिरंजीव जयवर्धने हे बिबट्याच्या तावडीतून शनिवारी दुपारी थोडक्यात बचावले. शालिनी विखे या शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोणी बुद्रूक (ता.राहाता) येथील शेतात नातवंडांना जेवू घालत होत्या. यावेळी अचानक डोळ्याची पापणी लवते न लवते, तोच उसातून बिबट्याने त्यांच्याकडे झेप घेतली. तिघांपासून अवघ्या पाच फुटांवरील बसलेल्या त्यांच्या कुत्र्याला बिबट्याने जबड्यात पकडले. आणि बिबट्या तेथून क्षणात उसात दिसेनासा झाला.
देवाच्या कृपेने कुत्रे मधे आले, अन्यथा...? काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. ग्रामदैवत म्हसोबाच्या कृपेने फार मोठे विघ्न टळले. लोकांची अहोरात्र सेवा विखे घराणे करीत आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी आहेत. या आशीवार्दाच्या शक्तीमुळेच आम्ही बचावलो, अशी प्रतिक्रिया शालिनी विखे यांनी दिली.