कोण असेल ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात?; काही तासांत होणार स्पष्ट
By चंद्रकांत शेळके | Published: October 24, 2023 06:07 PM2023-10-24T18:07:45+5:302023-10-24T18:07:53+5:30
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला.
अहमदनगर : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झालेले असले तरी बुधवारी (दि. २५) दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने तीननंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दि. ५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला. १९४ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७०१ सदस्यांच्या जागांसाठी ७ हजार २६० अर्ज दाखल झाले आहेत. तर १९४ सरपंचपदासाठी १३११ अर्ज आले आहेत. मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आता माघारीच्या अंतिम दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी गावातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर नेहमीच चुरशीच्या लढती होतात. सरपंचपदाबरोबरच सदस्यासाठीही एकास एक लढतीऐवजी बहुरंगी लढती पहायला मिळतात. त्यामुळे अर्ज माघारीचा दिवस असला तरी सदस्यांच्या जागेसाठी ४ ते ५ हजार अर्ज शिल्लक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बुधवारी माघारीनंतर लगेच चिन्हवाटपही होणार आहे.
५ नोव्हेंबरला मतदान
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोण गुलाल घेणार आणि कोणाचे पानीपत होणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे.