कोण होणार खासदार?
By Admin | Published: May 15, 2014 10:51 PM2014-05-15T22:51:18+5:302023-10-30T11:35:03+5:30
अहमदनगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतलेली कोलांटी उडी, ऐनवेळी उमेदवार शोधासाठी शिवसेनेची झालेली दमछाक
कोण होणार खासदार? अहमदनगर: शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतलेली कोलांटी उडी, ऐनवेळी उमेदवार शोधासाठी शिवसेनेची झालेली दमछाक, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वपक्षीयांच्या विरोधाला आवर घालण्यासाठी खासदार दिलीप गांधी आणि राजीव राजळे यांनी पणाला लावलेली ताकद, नरेंद्र मोदी, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासारख्या दिग्गजांच्या झालेल्या सभा, दीपाली सय्यद, बी.जी. कोळसे पाटील, नितीन उदमले यांनी मैदानात घेतलेली उडी, अण्णा हजारे यांच्या आशीर्वादासाठी लागलेली चढाओढ यामुळे दोन्ही मतदारसंघातील निवडणूक रंगतदार झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. त्यामुळे लोकसभेची लढाई कोण जिंकणार? याचीच उत्कंठा लागली आहे. कमळ की घड्याळ? धनुष्य बाण की पंजा? अशा चर्चा रंगतच गुरुवारची रात्र संपली. कोणाचे दिवस सुखाचे होणार? याची जशी उमेदवारांना चिंता लागली आहे, तशीच कोण होणार आपला भावी खासदार? असा प्रश्न घेऊनच नगरकरांचा शुक्रवार उजाडणार आहे. कोण हरणार आणि कोण जिंकणार? याचबरोबर कोणी कोणाचे काम केले? आणि कोणी कोणाला पाडले? याचाही निकाल लागणार आहे. लोकसभेच्या निकालाकडे सर्वांचेच डोळे आणि कानही लागले आहेत. शुक्रवारची सकाळ उजाडल्यानंतर निकाल हाती येण्यासाठी काही तासांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये नेत्यांची मोठी फौज, तर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नेत्यांची कमतरता दाखविणारी ही लोकसभा निवडणूक विकासाच्या प्रश्नांपेक्षा अंतर्गत राजकारणानेच जास्त पोखरली होती. नरेंद्र मोदींची हवा आणि राहुल गांधी यांची सभा विद्यमान खासदार असलेल्या गांधी-वाकचौरे यांना आपापल्या मतदारसंघात तारणार का? राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटच्या क्षणी एकवटलेली ताकद राजळे यांना दिल्लीला जाण्यासाठी उपयोगी पडेल का? हे काही तासातच कळणार आहे. बबनराव घोलप यांची दांडी उडाल्यानंतर ऐनवेळी उमेदवारी मिळालेल्या सदाशिव लोखंडे यांना वाकचौरे यांच्या नकारात्मकतेचा फायदा की तोटा होणार, तशीच विखेंची गुलदस्त्यातील भूमिकाही निकालाने उघड होणार आहे. एकंदरीतच आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट करणारी ही निवडणूक अनेकांच्या राजकीय भवितव्याचाही निकाल लावणार आहे.