साईसंस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:56 PM2021-06-13T12:56:41+5:302021-06-13T12:57:23+5:30

शिर्डी : राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे. एककीडे राजकीय चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे मात्र राजकारणातील प्रस्थापित चेहरे संस्थानरवर आल्यास सर्वसामान्य व भाविकांमध्ये रोष तयार होवू शकतो, अशीच परिस्थिती आहे.

Who will be the president of Sai Sansthan? | साईसंस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ?

साईसंस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ?

प्रमोद आहेर 

शिर्डी : राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर राहणार आहे. एककीडे राजकीय चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत, तर दुसरीकडे मात्र राजकारणातील प्रस्थापित चेहरे संस्थानरवर आल्यास सर्वसामान्य व भाविकांमध्ये रोष तयार होवू शकतो, अशीच परिस्थिती आहे.

 

उच्च न्यायालयाने विश्वस्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साईमंदीर उघडण्यापूर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगुल वाजेल, अशी चिन्हे आहेत. यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आहे. सिद्धीविनायक देवस्थानचे अध्यक्षपद सेनेकडे असल्याने साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहे.

राष्ट्रवादीकडून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. स्थानिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती माहिती असणे ही काळे यांची जमेची बाजू आहे. मात्र त्यांच्या कारखान्यात होणारी मद्य निर्मिती धार्मिक संस्थानच्या दृष्टीने नैतिकतेचा मुद्दा होवू शकतो. आमदार रोहित पवार यांच्याही नावाची चर्चा असून पवार संस्थानसाठी नवखे आहेत. मात्र त्यांना मोठे राजकीय पाठबळ आहे. याशिवाय कोविडमध्ये उल्लेखनीय काम करणारे आमदार निलेश लंके यांच्या नावासाठी जनतेतून होणारी मागणी ही लंकेची जमेची बाजू आहे. सामान्य कुटूंबातील असलेल्या लंके यांना मात्र अध्यक्ष होण्यासाठी पुरेसे राजकीय पाठबळ नाही.

काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. स्थानिक परिस्थितीची जाण असली तरी ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक असल्याने एकाच कुटूंबात अनेक पदे देतांना विचार होवू शकतो.

श्रद्धा व विकासाची सांगड घालणारा, भक्तांच्या समस्या जाणून घेणारा, शिर्डीचे आंतराष्ट्रीय महत्व वृद्धींगत करतांनाच सामाजिक दृष्टीकोण असणारा अध्यक्ष साईसंस्थानला मिळावा अशी भाविकांची सदैव अपेक्षा असते. सुदैवाने दोन्ही पक्षांकडे भाविकांना भावतील व विकास कामांसाठी धावतील असे अनेक डायनॅमिक चेहरे आहेत. त्यादृष्टीने निवड होण्यासाठी संबधित पक्षाकडे मात्र इच्छाशक्तीची गरज आहे. एकुणच संस्थानच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

-------------

उपाध्यक्षपद सेनेकडे ?

उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे रविंद्र मिर्लेकर यांचे नाव निश्चित असून विश्वस्त पदासाठी मुंबई, मालेगाव, बीड, राहुरी येथील पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची नावेही लवकरच निश्चित होणार असून संगमनेर, श्रीरामपुर व शिर्डीतील प्रत्येक एक विद्यमान पदाधिकारी तर राष्ट्रवादीकडून शिर्डी, कोपरगाव व श्रीरामपूरमधुन जिल्हा व राज्यस्तरीय तीन आजी-माजी पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.

---------------

सर्वसामान्य व्यक्तीच अध्यक्ष व्हावी- संभाजी बिग्रेड

शिर्डी येथील साई संस्थानच्या अध्यक्षपदावर कोणीही प्रस्थापित राजकीय चेहरा, साखर सम्राट, मद्य सम्राट असू नये. अध्यक्षपदावर सर्वसामान्य माणूस असणे गरजेचे आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 

Web Title: Who will be the president of Sai Sansthan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.