गडाख-मुरकुटेंच्या लढतीत बाजी कोण मारणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 03:45 PM2019-10-18T15:45:28+5:302019-10-18T15:45:35+5:30
नेवासा मतदारसंघात भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आव्हान उभे केले आहे. दोन्ही उमेदवारांनी गावागावात प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले हे गडाख यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यातून गडाख-घुले ही दरी संपली. दुसरीकडे विठ्ठल लंघे हे पुन्हा पक्षांतर करुन भाजपत गेले आहेत.
नेवासा तालुका वार्तापत्र - सुहास पठाडे ।
नेवासा मतदारसंघात भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आव्हान उभे केले आहे. दोन्ही उमेदवारांनी गावागावात प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले हे गडाख यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यातून गडाख-घुले ही दरी संपली. दुसरीकडे विठ्ठल लंघे हे पुन्हा पक्षांतर करुन भाजपत गेले आहेत.
नेवासा हा स्वतंत्र विधानसभा मतदार संघ झाल्यानंतर २००९ च्या पहिल्याच निवडणुकीत शंकरराव गडाख मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. मुळा कारखाना, मुळा एज्युकेशन, इतर सहकारी संस्था, शनिशिंगणापूर देवस्थानच्या माध्यमातून त्यांचा तालुक्यात संपर्क आहे. २०१४ ला मात्र मोदी लाटेत बाळासाहेब मुरकुटे विजयी झाले. राज्यातील अनेक नेत्यांसह गडाख यांनाही पराभव पत्करावा लागला. पुढे राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करत गडाख यांनी पक्ष सोडला. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वर्चस्व मिळवले.
यावेळी कोणत्याही पक्षात न जाता गडाख क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडूनच उमेदवारी करत आहेत. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवार न देता गडाख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग हेही त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले. गडाख व घुले यांच्यात विसंवाद होता. मात्र, दोघांचेही आता मनोमिलन झाले आहे. घुले हे प्रचारात सक्रीय असून गावोगावी सभा घेत आहेत. शरद पवार यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने त्यांचे समर्थक संतप्त आहेत. त्याचा फायदा गडाख यांना मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतील विठ्ठल लंघे मात्र पक्षांतर करुन पुन्हा भाजपत गेले. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ केली होती. मात्र, ती न स्वीकारता ते मुरकुटे यांच्यासोबत गेले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे स्वत: प्रचारात उतरले आहेत.
मुरकुटे यांच्यासाठी मुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या. भाजपमधील नाराजी दूर करण्यासाठी मुरकुटे यांना धावपळ करावी लागली. गडाख, मुरकुटे यांसह नेवासा मतदारसंघात १७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. बसपकडून विश्वास वैरागर, मनसेचे सचिन गव्हाणे, वंचितचे शशिकांत मतकर यांच्यासह माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गडाख, राजेंद्र निंबाळकर, कारभारी धाडगे, मच्छिंद्र मुंगसे आदी उमेदवारही प्रचार करत आहेत.
प्रचारातील प्रमुख मुद्दे
नेवासा तालुक्यात आमदारकीच्या माध्यमातून १२०० कोटींच्या विकास निधीतून गावोगावी अनेक विकास कामे केली. जनतेपर्यंत शासकीय योजना पोहचविल्या. तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी एक हजार कोटींचा निधी प्रस्तावित आहे हे मुरकुटे यांचे प्रचारातील मुद्दे आहेत. गडाख परिवारावरही ते टीका करत आहेत.
तालुक्यातील पाणी प्रश्न हाताळण्यात मुरकुटे यांना अपयश आल्याने तालुक्याचे वाळंवट होत आहे, अशी टीका गडाखांकडून होत आहे. धनगर, मुस्लिम आरक्षण, घरकूल योजना, धरणग्रस्तांचे प्रश्न, निकृष्ट दर्जाची विकास कामे या मुद्यांवर गडाखांचा प्रचार सुरू आहे. मुरकुटे यांनी आपले नातेवाईक ठेकेदार केले, असाही आरोप ते करतात.