मनपाच्या शाळा तारणार कोण ?
By साहेबराव नरसाळे | Published: May 23, 2018 11:38 AM2018-05-23T11:38:20+5:302018-05-23T12:19:21+5:30
नगर शहरात महापालिकेच्या १२ शाळा आहेत. शाळांना सध्या उन्हाळ्याची सुटी आहे. पावसाळ््याच्या तोंडावरच शाळा सुरू होतात. यातील आठ शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे.
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : नगर शहरात महापालिकेच्या १२ शाळा आहेत. शाळांना सध्या उन्हाळ्याची सुटी आहे. पावसाळ््याच्या तोंडावरच शाळा सुरू होतात. यातील आठ शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या शाळांची वेळेत दुरुस्ती आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील वातावरणही शिक्षणास पोषक नाही. काही शाळांच्या आवारात नशिली पदार्थ विकले जातात. काही ठिकाणी मटका, जुगार चालतो तर एका शाळेजवळच देशी दारूचे दुकान आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मुले या शाळांमध्ये शिकतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने या शाळांची दुरुस्ती करुन नवनिर्माण करावे.
भुतकरवाडी - छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय
भुतकवाडी चौकातच महापालिकेची शाळा आहे. या शाळेची इमारतही अत्यंत जुनी झालेली आहे. शाळेच्या आवारात जुगार, मटक्याचे अड्डे आहेत. शाळेच्या भिंतीला चिकटूनच रिक्षा लावल्या जातात. या रिक्षांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून मटक्याची आकडेमोड चालते तर रस्त्यालगतच्या एका टपरीत जुगार आणि मटका चालतो. काही टपऱ्यांमध्ये मावा, तंबाखू, सिगारेट अशी नशिली पदार्थ सर्रास विकली जातात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. शाळेच्या समोरच मैदान आहे पण परिसरातील नागरिक या मैदानात कचरा आणून टाकतात. त्यामुळे महापालिकेने याचा लाभ उठवत थेट कचराकुंड्याच आणून ठेवल्या आहेत. या कचºयाचा दुर्गंध थेट शाळेत येतो. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाला लागून असलेल्या वेड्याबाभळींच्या बनात नागरिक शौचालयाला जातात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनाही नाक दाबूनच बाराखडी गिरवावी लागते. शाळेतील शिक्षकांसमोरच पुरुष या मैदानात लघुशंका करतात. त्यामुळे या महिला शिक्षकांचीही मोठी कुचंबना होते.
सर्जेपुरा - शाळा क्रमांक ११ व १३
सर्जेपुरा येथील हुंडेकरी ट्रान्सपोर्ट समोर रस्त्यालगतच महापालिकेची अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय (मराठी माध्यम) व त्याशेजारीच शहीद अब्दुल हमीद उर्दू विद्यालय आहे. शाळेच्या पायºया उतरल्या की मुलं थेट रस्त्यालाच लागतात. मंगळवारी सर्जेपुरा येथील आठवडा बाजार असल्यामुळे शाळेसमोर आणि रस्त्यावर बाजारकरूंनी पथाºया मांडलेल्या. शाळेचा समोरून फोटो काढायलाही जागा नाही, अशी अवस्था. या दोन्ही शाळा एकमेकांना चिकटून बांधलेल्या. समोरून अगदीच सुस्थितीत दिसत असल्या तरी शाळेच्या भिंतींना घुशी लागलेल्या. काही ठिकाणी घुशींनी भिंत उकरल्याचे दिसते. शाळेच्या पाठीमागच्या भिंतीला चिकटूनच एक मोठी गटार वाहते. तिला परिसरातील लोकं नाला म्हणतात. ही गटार उघडी असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी येते. पाच मिनिटंही तेथे थांबणे अत्यंत अवघड. नाक मुठीत धरूनच शाळेच्या मागील आवाराचे फोटो काढावे लागेल. या शाळेत रोज मुले कशी बसत असतील, असा प्रश्न ही गटार पाहून कोणालाही पडेल. शिक्षक, विद्यार्थी यांच्या आरोग्याचा प्रश्न या गटारीमुळे धोक्यात आला आहे.
झेंडीगेट - डॉ. अल्लामा इकबाल उर्दू विद्यालय
झेंडीगेट येथील डॉ. अल्लामा इकबाल उर्दू प्राथमिक विद्यालयाची भव्य इमारत आहे. ही इमारतही अत्यंत जुनी झालेली आहे. या विद्यालयाला चहूबाजूंनी संरक्षकभिंत आहे. पण या भिंतीला दोन ठिकाणी बोगदे पडले आहेत. गेटही सताड उघडे असते. कोणीही, कधीही शाळेत घुसावे, अशी या शाळेची अवस्था. शाळेच्या संरक्षक भिंतीला लागूनच गटार आहे. ही गटार बंदिस्त आहे. पण त्यावर बसविलेल्या फरशा ठिकठिकाणी उखडल्या आहेत. त्यामुळे ही गटार नावालाच बंदिस्त आहे. या उघड्या गटारीचा मुलांना धोका निर्माण झाला असून, दुर्गंधी पसरत आहे. शाळेची मागील बाजू घुशींनी उकरून भुसभुशीत केली आहे. घुशींनी ठिकठिकाणी मोठमोठी बिळे तयार केली आहेत. भिंतींजवळच घुशींनी पोखरल्यामुळे शाळा पडण्याचीही शक्यता आहे. शाळेच्या पाण्याच्या हौदात रिकाम्या बाटल्यांचा खच साचलेला आहे. त्यावरील झाकणही तुटलेले आहे.
रेल्वे स्टेशन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय
रेल्वे स्टेशन येथे महापालिकेचे डॉ. बाबसाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय आहे. रेल्वे स्टेशनच्या समोरच हे विद्यालय आहे. विद्यालयाच्या उत्तर आणि पश्चिम बाजूंच्या भिंतीला चिकटूनच असलेल्या टप-यांमध्ये मावा, सिगारेट, तंबाखू असे नशेचे पदार्थ विकले जातात. एका टपरीत मटका खेळला जातो. शाळेपासून सुमारे ५० मीटर अंतरावर देशी दारूचे दुकान आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हातगाड्यांवरील कचराही शाळेच्या भिंतीजवळ आणून टाकला जातो. त्याचीही दुर्गंधी विद्यार्थ्यांना सहन करावी लागते.स्वयंउत्पन्नातून चालणारी एकमेव शाळा - रेल्वे स्टेशन येथील शाळा महापालिकेच्या स्वयंउत्पन्नातून चालविली जाणारी एकमेव शाळा आहे. या शाळेला सरकारचे कोणतेही अनुदान मिळत नाही. शाळेचा आतील परिसर एकदम स्वच्छ आहे. आतील भिंतीही बोलक्या असल्यामुळे शाळेतील वातावरण प्रसन्न वाटते.
केडगाव - शिवसामर्थ्य प्राथमिक शाळा
केडगावमध्ये महानगरपालिकेची शिवसामर्थ्य प्राथमिक शाळा आहे. केडगावमधील दूधसागर सोसायटीत प्रशस्त जागेत ही शाळा आहे. शाळेचे गेट तुटून पडलेले आहे. शाळेला मुख्य गेटच नसल्याने परिसरातील लोकांना ही शाळा ‘आओ जाओ अपना घर’ बनली आहे. त्यामुळे गुटखा, मावा, पानाच्या पिचकाºयांनी रंगलेली रांगोळी पाहुण्यांचे स्वागत करते. शाळेला मोठे कुंपण आहे. मात्र आता ते नावालाच उरले आहे. ज्या ओट्यावर शाळेची प्रार्थना, ध्वजारोहण व इतर कार्यक्रम होतात, त्याचे दगड ढासळले आहेत. तेथेही पिचका-यांचा सडा पडलेला दिसतो़ शाळेला प्रशस्त मैदान आहे. मात्र या मैदानात झाडे-झुडुपे वाढली आहेत. शालेय आवारात बसवलेले ब्लॉक वेडेवाकडे झाले आहेत.
बुरुडगाव- छत्रपती शाहू महाराज विद्यालय
बुरुडगाव येथील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयासमोर गुळगुळीत मैदान आहे. शाळेची इमारतही देखणी आहे. गेटमधून आत प्रवेश केला की शाळा प्रसन्न वाटते. शाळेच्या भिंती बोलक्या आहेत. झाडांमुळे शाळेचा आवारही प्रसन्न आहे. त्यामुळेच या शाळेला आदर्श शाळेचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण याच शाळेच्या पाठीमागची बाजू कच-याने भरलेली आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचलेले दिसतात. हा अपवाद वगळल्यास शाळा उत्तम स्थितीत आहे.
बोल्हेगाव- कै. ठाकरे शाळा
नगर शहरातील काही शाळा बंद पडल्यानंतर महापालिकेने बोल्हेगाव येथील गांधीनगरमध्ये नव्याने शाळा सुरु केली आहे. ही शाळा सुस्थितीत असून, मुलांना तेथे खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान आहे. दोनशेपेक्षा जास्त मुले गांधीनगरच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याचे सांगण्यात आले.
तोफखाना-साठे विद्यालय
तोफखाना येथील नवरंग व्यायामशाळेजवळ शाहीर अण्णा भाऊ साठे प्राथमिक विद्यालय आहे. या शाळेची इमारत अत्यंत जुनी झालेली असून, शाळेवरचे पत्रे गंजले आहेत. अत्यंत चिंचोळ्या रस्त्याला चिकटूनच ही शाळा आहे. त्यामुळे शाळेच्या पाय-या उतरल्या की मुले थेट रस्त्यावरच येतात. शाळेच्या पाठीमागे पोलीस परेड ग्राउंड आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ग्राउंडच नाही. रस्त्यावरील धूळ, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्नमुळे विद्यार्थ्यांना या शाळेत शिक्षण घेणेही जिकिरीचे झाले आहे.
सावेडी - फुले विद्यालय
सावेडी गावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची इमारत सुस्थितीत आहे. शाळेसमोरील मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांसाठी खेळण्या बसविलेल्या आहेत. ही शाळा पूर्णपणे बंदिस्त आहे.
बारा शाळांमध्ये ४५ शिक्षक, ३ मुख्याध्यापक
महापालिकेच्या बारा शाळांमध्ये ४५ शिक्षक आहेत. कोणत्याही शाळेला शिपाई नाही. १५० पटसंख्या असली तरच मुख्याध्यापकाचे पद मंजूर होते. त्यामुळे तीन शाळांना मुख्याध्यापक आहेत. त्यात एक मुख्याध्यापक जूनअखेर निवृत्त होणार आहे. शिक्षकांचा ५० टक्के पगार राज्य शासनामार्फत, तर ५० टक्के पगार महापालिकेमार्फत होतो. महापालिकेकडून शिक्षकांचा पगार दर तीन महिन्यांनी होतो. महापालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे कारण देत शिक्षकांचे पगार रखडलेले असून, सध्या मार्चपर्यंतचे वेतन अदा झालेले आहे. याशिवाय १५० निवृत्त शिक्षकांचे वेतनही रखडलेले आहे. शहरामध्ये पूर्वी २४ शाळा होत्या. १५ शाळा बंद पडल्या, तर ओंकारनगर, आदर्शनगर, गांधीनगर येथील तीन शाळा २०१०-११ मध्ये नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या महापालिकेच्या १२ शाळा सुरू आहेत.बारापैकी दोन शाळा उर्दू आहेत. सर्व शाळामध्ये १ ली ते ७ वी चे वर्ग आहेत.
तीन शाळा होणार डिजिटल
बारापैकी तीन शाळा येत्या जूनपासून डिजिटल होणार आहेत. प्रत्येक शाळेला एक संगणक, एक ३२ इंची स्मार्ट टीव्ही, ई-लर्निंगसाठी एक सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी महापालिकेने अडीच लाख रुपये मंजूर केले आहेत. ही प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण होईल. महापालिकेच्या शाळेतील २० टक्के विद्यार्थी अप्रगत असून, गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाधिकारी संजय संजय मेहेर यांनी सांगितले.
शालेय पोषण आहार, गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी चारशे रुपये अनुदान सर्व शिक्षा अभियानातून दिले जाते. तसेच दुरुस्तीसाठी सातवीपर्यंतच्या शाळेला साडेसात हजार रुपये, पाचवीपर्यंतच्या शाळेला पाच हजार रुपये अनुदान मिळते. नियमित देखभाल-दुरुस्तीसाठीच हे अनुदान खर्च होते. शाळा दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव महापालिकेत धूळखात पडले आहेत.
शाळा आणि विद्यार्थी संख्या
१) रिमांड होम ९०
२) रेल्वे स्टेशन २२६
३) सर्जेपुरा ४०
४) सर्जेपुरा ३१
५) बुरुडगाव ३४
६) सावेडी १२१
७) झेंडीगेट ३३
८) केडगाव ३७
९) भुतकरवाडी ३२
१०) गांधीनगर २०३
११) आदर्शनगर २८
१२) ओंकारनगर ६४
एकूण संख्या ९३९