‘कसला महिला दिन ?’ : श्रीगोंद्यातील भंगार गोळा करणा-या महिलांचे वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:19 PM2019-03-09T16:19:19+5:302019-03-09T16:19:23+5:30
हरांमध्ये महिला दिनाचे कौतुक सोहळे होत असताना शुक्रवारी महिलादिनी श्रीगोंद्यातील उकिरड्यावर पाठीवर गोणपाट
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : शहरांमध्ये महिला दिनाचे कौतुक सोहळे होत असताना शुक्रवारी महिलादिनी श्रीगोंद्यातील उकिरड्यावर पाठीवर गोणपाट घेऊन कचऱ्यातून भंगार गोळा करून भाकरीचा अर्ध चंद्र शोधणाºया कष्टकरी महिलांच्या दिनचर्येत काहीच फरक पडलेला नव्हता. या महिला पोटाची खळगी भरण्यासाठी नेहमीप्रमाणेच उकिरडे चाळून भंगार गोळा करीत होत्या. ‘कसला महिला दिन अन् कसे मोदी सरकारचे अच्छे दिन’ अशा भावना त्या व्यक्त करीत होत्या. महिला दिनी पेडगाव रस्त्याच्या कडेला खांद्यावर गोणी घेऊन अनिता मकवाणे, अश्विनी मकवाणे, रूपाली मकवाणे, मनीषा मकवाणे, मयुरी मकवाणे, संगीता मकवाणे या महिला भंगार गोळा करीत होत्या. जीवनातील कष्ट व यातनांची कहाणी कथन करताना त्यांनी डोळ्यात पाणी आणले.
श्रीगोंदा शहरात गोसावी मोतीवाले समाजातील ४०-४५ कुटुंब आहेत. या कुटुंबातील महिला, पुरूष पूर्वी घरोघर जाऊन बांगड्या, महिलांच्या गळ्यातील कानातील नकली दागिने विकत होत्या. गेल्या १५-२० वर्षांपासून हा व्यवसाय संपला. या मोतीवाले जातीतील महिलांना पोटासाठी उकिरडे, नाले, गटारी, काटवनात प्लास्टिक काचेच्या बाटल्या, इतर वस्तू, कागदी पुठ्ठे गोळा करून गुजराण करावी लागत आहे.
पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत या समाजातील ३०/३५ महिला व मुली भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. त्यांचे रोजचे जगणेच भंगाराशी बांधले आहे. पहाटे चार वाजता उठून दिवसभर कष्ट करून संध्याकाळी चारच्या आत घरात येणे, हे त्यांचे जीवनचक्र बनले आहे. त्यांच्या या नरक यातना कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे.
दिवसभर घाण, रात्री डोकेदुखी
दररोज उठले की, घाणीतून प्रवास सुरू होतो. त्यामुळे या महिलांना श्वसन, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. काही वेळा दिवसभर उकिरडे चाळून मिळालेले २०० रूपये संध्याकाळी दवाखान्यात घालावे लागतात. घरात पोरंसोरं उपाशी तापाशी झोपतात. पण कुणाला अंतर्मनातील दु:ख सांगायचे? त्यावर कोण इलाज करणार? असा या महिलांचा प्रश्न व व्यथा आहे.
स्वच्छतादूत नारी
सरकारच्या स्वच्छता अभियानात नेते मंडळी, अधिकारी फक्त फोटोसेशन करतात. दिवसभर भंगार घाणीशी सामना करून कचरा गोळा करणा-या या महिलांचा खरे तर नगरपालिका, आरोग्य विभागाने पालिकेत बोलावून ‘स्वच्छतादूत नारी’ म्हणून सन्मान केला पाहिजे.
हेच आमच्या नशिबी हाय...
‘भाऊ, आमचं घर या मोडक्या बाजारावर चालतं बगा... न चुकता पहाटे सव्वाचार वाजता घरातून बाहेर पडायचं... काचा, बाटल्या, भंगाराचं लोखंड, मिळल ते दिवसभर गोळा करायचं... संध्याकाळी शे-दीडशे रूपये घेऊन घराकडं यायचं... १५ वरसं हा नेम काय चुकला नाही बगा... भंगार गोळा करणं हेच आमच्या नशिबी हाय..’ - मालनबाई मकवाणे, पेडगावरोड, श्रीगोंदा.