पुढचा महापौर कुणाचा, सेनेचा की राष्ट्रवादीचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:49+5:302021-01-23T04:20:49+5:30
अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी असला तरी महाविकास आघाडीत आतापासून खलबते सुरू झाली ...
अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी असला तरी महाविकास आघाडीत आतापासून खलबते सुरू झाली आहेत. पुढील महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे महापौर पदासाठी महिला उमेदवार आहेत. मात्र पुढील काळात काय राजकीय घडामोडी घडतात, नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लागते की सेनेचा महापौर होतो, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे यांची २८ डिसेंबर २०१८ मध्ये महापौरपदी निवड झाली. महापौरांची मुदत संपण्यास सहा महिन्यांचा अवधी आहे. पुढील महापौर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे, रीता शैलेश भाकरे, शांताबाई दामोधर शिंदे या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. काँग्रेसच्या शीला दीप चव्हाण, तर राष्ट्रवादीच्या रूपाली जोसेफ पारगे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे महापौर पदासाठी महिला उमेदवार आहेत. भाजपकडे पुढील महापौरपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवार नाही. खासदार डॉ. सुजय विखे यांनी महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नाही, अशी भूमिका स्पष्ट मांडली आहे.
.............
कोण देणार कोणाला साथ
महापौर पदासाठी सेनेच्या शेंडगे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे डॉ. सागर बोरुडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडूण आलेले आहेत. परंतु, महापौर पद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत बोरुडे यांना पत्नीला निवडून आणावे लागेल. तशी रणनीतीही राष्ट्रवादीकडून आखली जात असल्याची चर्चा मध्यंतरी होती. परंतु, महापौरपद राष्ट्रवादीलाच मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ही चर्चाही आता मागे पडली आहे. काँग्रेसकडे महापौरपदासाठी उमेदवार आहे. पण, काँग्रेसचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष काँग्रेसच्यामागे ताकत उभी करतील का? हाही प्रश्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत सेनेचे पारडे जड आहे, पण राष्ट्रवादी सेनेला साथ देईल का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी ठरविल्यास ते शक्य आहे, असाही एक मतप्रवाह आहे.