दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 02:54 PM2021-02-06T14:54:18+5:302021-02-06T14:54:27+5:30
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.
संगमनेर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. शेतक-यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखविणा-या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा आता उघड झाला आहे, अशी टिका त्यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवारी (दि.६) ग्रामसंसद भवनाचे उद्घाटनप्रसंगी आमदार विखे बोलत होते. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही. जिल्ह्याचे तीनही मंत्री कुठे गायब होते समजले नाही. परंतू आपण शक्य तेवढी मदत करून मतदारसंघातील सामान्य माणसाला दिलासा देवून सामाजिक बांधिलकी जपली.
केंद्र सरकारच्या नविन कृषी धोरणात शेती क्षेत्रातील बदलांचा अंतर्भाव असून या विधेयकांना केला जाणारा विरोध राजकीय द्वेषापोटी आहे. पण दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे महाविकास आघाडीचे नेते राज्यात शेतक-यांची वीज तोडली जात असताना गप्प बसतात.
राज्यातील आणि दिल्लीतील शेतकरी काही वेगळे आहेत का? महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतक-यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. शेतकरी आणि दूध उत्पादकांवर सरकारकडून अन्यायच सुरु आहे. त्यांचे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम जनतेने ओळखले आहे, असेही ते म्हणाले.