दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:26+5:302021-02-07T04:19:26+5:30
संगमनेर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? ...
संगमनेर : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. शेतक-यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखविणा-या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा आता उघड झाला आहे, अशी टिका त्यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवारी (दि.६) ग्रामसंसद भवनाचे उद्घाटनप्रसंगी आमदार विखे बोलत होते. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारने कोणतीही मदत केली नाही. जिल्ह्याचे तीनही मंत्री कुठे गायब होते समजले नाही. परंतू आपण शक्य तेवढी मदत करून मतदारसंघातील सामान्य माणसाला दिलासा देवून सामाजिक बांधिलकी जपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकाराने आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन हा देश पुन्हा आत्मविश्वासाने पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने टाकलेले पाऊल हे महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या नविन कृषी धोरणात शेती क्षेत्रातील बदलांचा अंतर्भाव असून या विधेयकांना केला जाणारा विरोध राजकीय द्वेषापोटी आहे. पण दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे महाविकास आघाडीचे नेते राज्यात शेतक-यांची वीज तोडली जात असताना गप्प बसतात. राज्यातील आणि दिल्लीतील शेतकरी काही वेगळे आहेत का? महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतक-यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. शेतकरी आणि दूध उत्पादकांवर सरकारकडून अन्यायच सुरु आहे. त्यांचे शेतकऱ्यांवरील पुतना मावशीचे प्रेम जनतेने ओळखले आहे, असेही ते म्हणाले.
....
निवडणुकीत वाळूच्या पैशाचा जोर
जोर्वे गावात १६ कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत. विकासकामांना निधी कमी पडणार नाही. फक्त तुम्ही धाडस दाखवा. विघ्नसंतोषी लोकांचा बंदोबस्त कसा करायचा मी पाहातो. वाळू माफीयांनी हैदोस घातला आहे. सत्ता त्यांच्या पायाशी असल्याने जोर्व्यातील अनेक वाळू व्यावसायिक राज्यात राजरोसपणे पार्टनरशिप करुन हा व्यवसाय करीत आहेत. याच वाळू माफीयांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून ग्रामपंचायत निवडणुकीत याच वाळूच्या पैशांचा जोर होता. तरीही कनोली गावाने दाखवलेले धाडस हे तालुक्याला दिशा देणारे ठरले आहे, असेही आमदार विखे यांनी सांगितले.