नगर जिल्ह्यात का वाढतोय कोरोना- २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:51+5:302021-03-29T04:14:51+5:30
----------- सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. सरकारचे अनेक घोटाळे बाहेर निघत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी कोरोना वाढविण्याचे काम सुरू ...
-----------
सध्या राज्यात राजकारण तापलेले आहे. सरकारचे अनेक घोटाळे बाहेर निघत आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी कोरोना वाढविण्याचे काम सुरू आहे, असेच दिसते.
-शरद बोबडे, एकवीरा चौक
-----------
जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी अहवाल मिळतात. त्यामुळे संबंधित रुग्णास कोरोना आहे की नाही ते कळत नाही. तोपर्यंत तो सगळीकडे फिरत राहतो. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तोपर्यंत तो शंभर-दोनशे लोकांना भेटून आलेला असतो. त्यामुळे एका दिवसात कोरोना चाचणीचा अहवाल मिळाला तर कोरोना वाढणार नाही.
-ॲड. अमित गाडेकर, अहमदनगर
------------
मास्क न लावणे हे कोरोना वाढण्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. जरी काहींनी मास्क लावला तरी तो नाकाखाली लावतात, ज्याचा काहीच उपयोग होत नाही. होम क्वारंटाइन राहण्याला जास्त पसंती मिळत आहे. त्यामुळे घरातील इतर व्यक्तीही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. घरात सगळे नियम शिथिल असतात. सध्या लसीकरण सुरू आहे, ही एक चांगली बाब आहे. संपूर्ण भारतात लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे.
-हर्षल तांबोळी, बागरोजा हडको, नगर
--------------
राजकारणी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी गरीब जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी हे सगळे षडयंत्र रचल्याचे वाटत आहे. राज्यातील सरकार केवळ शंभर कोटींची वसुली करण्यासाठी काम करते आहे. कोरोनाचे कोणालाच देणे-घेणे नाही. कोरोना वाढला तर राजकारणी लोकांचे नव्हे तर सामान्य लोकांचेच जास्त हाल होणार आहेत. आधीच थोडेफार सावरलेले असताना पुन्हा कृत्रीिम कोरोना वाढवून राजकारण्यांना काय साध्य करायचे आहे, तेच समजत नाही. त्यामुळे कोरोनाचे खरे स्वरूप समजणे गरजेचे आहे.
-सुजय मोहिते, भूषणनगर, केडगाव
------------
लोक नियम पाळत नाहीत, हेच खरे कारण आहे. लोकांनी नियम हे स्वत:साठी पाळायचे आहेत, ते लोकांसाठी नव्हे. आपण नियम पाळले तर दुसरे सुरक्षित राहतील. खोकला, सर्दी, ताप आल्यास सगळीकडे न फिरता, लोकांच्या संपर्कात न जाता चाचणी व उपचार करण्यावर लोकांनी भर दिला तर कोरोना वाढणार नाही.
-डॉ. सागर बोरुडे, नागापूर
----------
कोरोनावरील लस सध्या उपलब्ध झाली आहे, त्यानंतर कोरोनाचे आकडे वाढत आहेत. लोकांना आता भीतीच्या छायेखाली जगणे आवडत नाही. त्यांना मुक्तपणे वावरणे आवडते. लोकांची हीच मानसिकता आता कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरली आहे.
-विशाल बोरुडे, बोरुडे मळा, नगर
----------
मास्क लावल्यानंतर दहा वेळा खाली-वर घेतला जातो. एका खासगी रुग्णालयात गेल्यावर तर तेथील स्टाफ मास्क वापरत नसल्याचे आढळून आले. कितीतरी दुकानदार मास्क लावत नाहीत, दुसरीकडे तेच सांगतात, लॉकडाऊन करू नका. दुकानदार मास्क लावत नाही म्हटल्यावर ग्राहकही मास्क लावत नाहीत. पेट्रोल पंपावरही ‘नो मास्क, नो पेट्रोल’ असे फलक लावलेले आहेत, मात्र नियम पाळताना कोणीच दिसत नाही.
-अभिषेक मेहेत्रे, कल्याण रोड, नगर
------------
नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. पोलीस दिसले तरच मास्क लावले जातात. सामाजिक अंतराचेही अनेक ठिकाणी पालन होत नाही. बाजार, भाजीबाजारात तर या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. कोरोना वाढण्यामागे हेच एकमेव कारण आहे.
-धनंजय सातपुते, सुनील गारुडकर, नगर
-------------
लोकांमध्ये आरोग्याबाबत निष्काळजीपणा पाहायला मिळतो. मास्क लावावा यासाठी दंड आकारावा लागतो, यापेक्षा दुर्दैव नाही. प्रत्येकाने नियम स्वत: पाळायचे आहेत. त्यासाठी प्रशासनाला रस्त्यावर उतरावे लागते, हे वाईट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले तरी कोरोना का वाढतो आहे, याचे उत्तर मिळेल.
-अप्रतिम मुळे, नगर
----