मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे का केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:15+5:302021-05-21T04:22:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ काॅन्फरन्सनंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे, यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ काॅन्फरन्सनंतर स्वत: मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे, यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ. भोसले यांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी यांची माहिती पंतप्रधानांना दिली. प्रत्येक उपायाची माहिती सांगताना डॉ. भोसले यांनी त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना दिले.
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. या संवादात मुख्यमंत्र्यांना बोलण्याची किंवा पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची वेळ आलीच नाही. तरीही अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांना देशपातळीवरील बैठकीत चर्चेत ठेवले.
राज्य सरकारने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून केलेले प्रयत्न, खासगी डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन या गोष्टींचा डॉ. भोसले यांनी आवर्जून उल्लेख केला.