घोडमध्ये पाणी शिल्लक असताना पिके का जाळताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:15+5:302021-01-20T04:21:15+5:30
काष्टी : घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र घोडचे आवर्तन ...
काष्टी : घोड लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र घोडचे आवर्तन लांबणीवर टाकले आहे. मग घोड धरणात पाणी शिल्लक असताना पिके का जाळताय? असा सवाल जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिलराव पाचपुते यांनी केला आहे.
घोड धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. धरणात सध्या ४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे आहे. त्या परिस्थितीत तीन आवर्तने शेतीसाठी सुटू शकतात.
कालवा सल्लागार समितीची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० फेब्रुवारीपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना कुठेही विचारात घेतलेल्या दिसत नाहीत. जर १० फेब्रुवारीला घोडचे आवर्तन सुटले नाहीतर धरणात पाणी असून शेतकऱ्यांचे ऊस फळबागा इतर पिके जळून जाणार आहेत. तरी तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही पाचपुते यांनी दिला आहे.
....
टाळे लावण्याचा इशारा
घोड धरणातून २० जानेवारीपासून पाणी सोडले तरच घोड लाभक्षेत्रातील पिके जिवंत राहतील. याबाबत कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा मढेवडगाव येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयास शेतकरी टाळे लावतील, असा इशारा शिवाजीराव पाचपुते व अनिलराव पाचपुते यांनी दिला आहे.
...
रास्ता रोको इशारा
हंगेवाडी परिसरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे . घोडचे आवर्तन आठ दिवसाच्या आत न सोडल्यास नगर-दौंड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागवडे साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी दिला आहे.
....
तसा अहवाल पाठविणार
घोड कालव्यावरील पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी घोडचे आवर्तन लवकर सोडावे याबाबत निवेदन दिले तर घोडचे आवर्तन नियोजनात बदल करावा असा वरिष्ठांना अहवाल पाठविणार आहे.
-स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक २.
..
१९घोड डॅम
....