का वाढला म्युकरमायकोसिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:46+5:302021-05-25T04:23:46+5:30

अहमदनगर : कोरोनावर उपचार करताना स्टिरॉईड, रेमडेसिविर, अँटीबायोटिक्स हे रुग्णांना जास्त प्रमाणात दिल्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाली. काहींच्या शरीरातील ...

Why increased myocardial infarction | का वाढला म्युकरमायकोसिस

का वाढला म्युकरमायकोसिस

अहमदनगर : कोरोनावर उपचार करताना स्टिरॉईड, रेमडेसिविर, अँटीबायोटिक्स हे रुग्णांना जास्त प्रमाणात दिल्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाली. काहींच्या शरीरातील लोहाचे प्रमाण एकदम वाढले. त्याचा परिणाम म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत वाढ होण्यात झाला, अशी माहिती इंग्लंडमध्ये कोरोनावर उपचार करणारे व म्युकरमायकोसिसवर विशेष अभ्यास असणारे डॉ. अशोक रोकडे यांनी सांगितली, तर फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, मधुमेह असणाऱ्या मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे. इतर मुलांना गंभीर आजार होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पालकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती पंडित यांनी केले. निमित्त होते ग्लोबलनगरी फाैंडेशन आयोजित कोविडमधून कसे वाचाल या शिबिराचे.

वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्तृत्ववान नामवंतांनी अमेरिकेत ग्लोबलनगरी फौंडेशनची स्थापना केलेली आहे. या फौंडेशनद्वारे नेहमीच विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून २२ मे रोजी कोविड उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे महाराष्ट्रीय जनतेला कोरोनाबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून खास मराठी भाषेतून ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. यात डॉ. अविनाश पुलाटे (दुबई), डॉ. अशोक रोकडे (इंग्लंड), डॉ. रमेश पंडित (अमेरिका), डॉ. मृणालिनी राडकर (अमेरिका) व डॉ. तृप्ती पंडित (अमेरिका) यांच्यासह डॉ. राजश्री काटके (मुंबई), डॉ. राहुल बंदसोडे (सोलापूर) यांनीही सहभाग घेतला.

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. त्यावरील उपाचारही खूप महागडे आहेत. औषधे उपलब्ध नाहीत. तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरही महाराष्ट्रात फार नाहीत. यावर माहिती सांगताना डॉ. रोकडे म्हणाले, म्युकरमायकोसिस हा जुनाच आजार आहे. वातावरणात सर्वत्र बुरशी असते. मात्र, आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे या बुरशीचा आपल्या शरीरावर परिणाम होत नव्हता. सध्या कोविडच्या उपचार पद्धतीत काही रुग्णांची प्रतिकारशक्ती एकदम कमी होते आणि बुरशीची लागण होते. ही बुरशी मुख्यत: नाक, डोळे, ताेंडाचा काही भाग येथे होते. डोळ्यांमधून ही बुरशी मेंदूकडे सरकू शकते. त्यातून रुग्णाचा मृत्यूही ओढावू शकतो. कोरोनात स्टिरॉईडचा अतिवापर सुरू झाला. गरज नसतानाही ते रुग्णांना दिले जाऊ लागले. त्याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर झाला. शरीरातील लोहाचे प्रमाण नको तितके वाढले अन् बुरशीचा थर नाका, डोळ्यात साठू लागला. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हा आजार अधिक बळावतो. अँटीबायोटिक्सचा वापरही काळी बुरशी वाढण्यात परिणामकारक ठरतो आहे. बुरशीचे प्रमाण वाढल्यास औषधांना प्रतिसाद कमी मिळतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना जर कोविड होऊन गेला असेल तर त्यांनी आर्वजून काळ्या बुरशीची तपासणी करून घ्यावी, असे डॉ. रोकडे यांनी सांगितले.

...........

बुरशीची सामान्य लक्षणे

नाकातून रक्त येणे, कोरड्या खपल्या पडणे.

दात सैल होणे, पडायला लागणे, रक्त येणे.

डोळ्याची हालचाल मंदावणे, नजर कमी होणे.

...........

तपासण्या

एमआरआय, सिटी स्कॅन तपासण्या आवश्यक आहेत.

..........

धोका का वाढतोय

बुरशी या आजाराला आतापर्यंत कोणीही गंभीरतेने घेतलेले नव्हते. त्यावर फारशी औषधांची निर्मितीही झालेली नव्हती. त्यामुळे आता अचानक रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर त्यातील तज्ज्ञ, औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना योग्य उपचाराअभावी जिवास मुकावे लागत आहे.

..........

मुलांना कोरोना झाल्यास अशी घ्यावी काळजी

अनेकजण म्हणतात की, लहान मुलांना कोरोना होऊ शकत नाही. लहान मुलांना कोरोना होतो, पण अनेकदा लक्षणे दिसत नाहीत. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना ताप येतो, पण ताप आला म्हणून घाबरुन जाऊन नका. ताप आल्यानंतर शरीरातील इतर विषाणू मारले जातात. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर आलेला ताप साधारण तीन दिवसांपर्यंत राहू शकतो. त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. सर्दीदेखील होऊ शकते. यात सॉल्ट स्प्रे खूप उपयुक्त ठरते. लिक्विड डायट म्हणजे ज्यूस, सूप किंवा वरण असे पदार्थ द्यावेत. शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये, असे डॉ. तृप्ती पंडित यांनी सांगितले.

..........

अँटीबायोटिक देणे टाळावे

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे लहान मुलांना ॲँटीबायोटिक देणे टाळावे. अँटीबायोटिक दिल्यानंतर बुरशी वाढण्याचे प्रमाण जास्त होतं. स्टिरॉईडनंतरही जास्त होतं. शरीरातील जिवाणू (बॅक्टेरिया) बुरशीला वाढू देत नाहीत. मात्र, अँटीबायोटिकमुळे जिवाणूंची ताकद कमी होते आणि बुरशीचा थर वाढत जातो. त्यामुळे अँटीबायोटिक देणे टाळावे, असे डॉ. पंडित यांनी सांगितले.

.........

लहान मुलांचे सिटी स्कॅन टाळावे

लहान मुलांच्या पेशी वाढत्या असतात. सिटी स्कॅनचे रेडिएशन (किरणोत्सार) उच्च असतात. हे रेडिएशन वाढत्या पेशींवर परिणाम करतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका बळावतो. त्यामुळे लहान मुलांची सिटी स्कॅन टेस्ट टाळावी. सिटी स्कॅनऐवजी एक्स-रे करावा, असेही डॉ. पंडित यांनी सांगितले.

Web Title: Why increased myocardial infarction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.