धनगर समाजाचा सरकारला एवढा राग का? उपोषणकर्त्याचा महाजनांना सवाल; २ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
By चंद्रकांत शेळके | Published: September 16, 2023 08:37 PM2023-09-16T20:37:23+5:302023-09-16T20:38:28+5:30
धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला.
अहमदनगर : गेल्या ११ दिवसांपासून चोंडीत आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण सुरू असताना या सरकारमधील एकाही मंत्र्याला उपोषणकर्त्यांची भेट घ्यावीशी वाटली नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला.
आरक्षणासाठी धनगर समाजाचे चोंडी (ता. जामखेड) येथे गेल्या ११ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यातील अण्णासाहेब रूपनर (वय ५५) या उपोषणकर्त्याची तब्बेत खालावल्याने शुक्रवारी रात्री त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची भेट घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला आले होते. उपोषणकर्ते रूपनर यांच्या तब्बेतीची विचारपूस करत असतानाच रूपनर यांनी संताप व्यक्त केला. घटनेत तरतूद असताना गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण देण्यास चालढकल सुरू आहे. त्यामुळे समाजबांधवांनी चोंडीत उपोषण सुरू केले. मात्र या सरकारने आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले. पालकमंत्र्यांसह एकही मंत्री आंदोलनाकडे फिरकला नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग का आहे? आम्ही एवढ्या दिवस तुमच्या पाठिशी राहिलो, मग आम्हाला वाऱ्यावर का सोडता. दोन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आपण औषधोपचार व पाणीही सोडू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. दोन दिवसांत मुंबईत याबाबत बैठक घेऊन नक्की तोडगा काढू, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. यानंतर ते चोंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत आमदार राम शिंदेही होते.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, उपोषणकर्ते रूपनर यांचे ९ किलो वजन कमी झाले आहे. मला माहिती मिळाल्यानंतर तातडीने दाखल झालो. त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह समाजातील लोकांची दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
पालकमंत्री उपोषणाकडे का गेले नाहीत?
गेल्या ११ दिवसांपासून धनगर समाजाचे उपोषण सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. ते मुद्दामहून गेले नाहीत, असा समाजाचा आरोप आहे, याबाबत पत्रकारांनी मंत्री महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, विखे का गेले नाहीत, याची माहिती मला नाही. मात्र मला समजल्यानंतर मी तातडीने आलो आहे.