आता फ्लॉटमध्ये पेटवायच्या का चुली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:18+5:302021-09-03T04:22:18+5:30

-------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वर्षभरात तीन ते चार वेळा गॅस सिलिंडरची दरवाढ झाली. आता तर दर महिन्यालाच ...

Why light a stove in a float now? | आता फ्लॉटमध्ये पेटवायच्या का चुली ?

आता फ्लॉटमध्ये पेटवायच्या का चुली ?

--------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : वर्षभरात तीन ते चार वेळा गॅस सिलिंडरची दरवाढ झाली. आता तर दर महिन्यालाच गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. गत महिन्यात २५ रुपयांनी दर वाढल्यानंतर पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ झाल्याने अहमदनगरमध्ये आता नऊशे रुपयांनाच गॅस सिलिंडर मिळणार आहे. कोरोनामुळे आधीच जगणे कठीण होत आहे. आता आम्ही काय फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या का? असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबात गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता दरमहा सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. गत वर्षभरात दोन ते चार वेळा झालेल्या दरवाढीतून २६५ रुपयांनी सिलिंडर महागला होता. २०१९ मध्ये पाचशे ते सहाशे रुपयांना मिळणारे सिलिंडर आता नऊशे रुपयांना मिळणार आहे. म्हणजे जवळपास सिलिंडरच्या दरात शंभर टक्के वाढ झाली आहे. शासनाने गरजूंना उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर दिले, मात्र आता ते भरून कोण देणार, असाही सामान्य महिलांना प्रश्न पडतो आहे.

---

दर महिन्याला नवा उच्चांक

महिना सिलिंडर दर

सप्टेंबर २०२० ६०७.५०

डिसेंबर- २०२० ७०७.५०

फेब्रुवारी- २०२१ ७८२.५०

मार्च- २०२१ ८३२.५०

जुलै- २०२१ ८४८.५०

ऑगस्ट २०२१ ८७३.५०

सप्टेंबर २०२१ ८९८.५०

---------------

सबसिडी झाली गायब

एका गॅस सिलिंडरच्या मागे किमान २०० रुपयांची सबसिडी मिळत होती. कोरोनाच्या काळापासून ती अचानक गायब झाली. त्याबाबत शासकीय स्तरावर कोणताही आदेश नव्हता. सबसिडी देताना त्याचा गाजावाजा झाला. मात्र, ती बंद कधी झाली, तेही ग्राहकांना कळाले नाही. अनेक सामान्य नागरिक बँक पासबुकावर किती सबसिडी झाली ते दरमहा तपासतात, मात्र त्यांना दोन वर्षांपासून अशी रक्कम जमा झाल्याचे दिसले नाही.

-----------

व्यावसायिक सिलिंडर महाग झाले

घरगुती वापराचे गॅस सिलिंडर २५ रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात गत महिन्यात ५० रुपयांची व या महिन्यात ५० अशी शंभर रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हे सिलिंडरही आता १७३० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे छोटे हॉटेल व्यावसायिक, चहा दुकाने, खाद्यपदार्थ्यांचे विक्रेते यांना मोठी झळ बसली आहे.

----------

दर महिन्यालाच गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे आमचेही बजेट कोलमडले आहे. आधीच महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यात या दरवाढीने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. दीड हजार रुपयांना मिळणारे व्यावसायिक सिलिंडर १७५० पर्यंत गेले आहे. आम्ही काय आता हॉटेलमध्ये चुली पेटवायच्या का ?

-निशांत भूतकर, हॉटेल व्यावसायिक

------------

आधीच उद्योग, व्यवसाय यावर पाणी फेरले आहे. सामान्य माणसांना जगणे कठीण झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा स्थितीत एकीकडे महागाई वाढत आहे, तर दुसरीकडे गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. त्यामुळे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. किराणा माल, भाज्या, फळे, मसाल्याचे पदार्थ अशा सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यात सिलिंडरची भर पडली आहे. आता काय आम्ही फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या का?

-संगीता राऊत (दिल्ली गेट), रोहिणी गव्हाणे (बोरुडे मळा)

-------------

Web Title: Why light a stove in a float now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.