पंचायतराज समितीकडून अधिका-यांची विकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:32 PM2018-10-05T14:32:49+5:302018-10-05T14:32:55+5:30
सन १३-१४ मधील लेखा परीक्षणातील आक्षेपांवर रात्री बारा-बारा वाजेपर्यंत अभ्यास करूनही पंचायत राज समितीसमोर जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत़
अहमदनगर : सन १३-१४ मधील लेखा परीक्षणातील आक्षेपांवर रात्री बारा-बारा वाजेपर्यंत अभ्यास करूनही पंचायत राज समितीसमोर जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत़ पंचायत राज समितीतील मुरब्बी आमदारांनी गुरुवारी दिवसभर झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांना हात घालत मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने व लेखा वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे यांच्यासह सर्वच विभाग प्रमुखांची जोरदार विकेट घेतली़ त्यामुळे अनेकांची सचिवांसमोर साक्ष लागल्याने माने यांच्या टीमने दोन महिने नेमकं काय तयारी केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक पार पडली़ बैठकीला आमदार चरण वाघमारे, सतीश चव्हाण, भरत गोगावले, श्रीकांत देशपांडे, रणधिर सावरकर, देवराम होळी, सुधाकर कोव्हळे, किशोर पाटील, सुरेश खाडे, विक्रम काळे, दिलीप सोपल, राहुल बोंद्रे, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते़ जिल्हा परिषदेच्या सन २०१३-१४ मधील लेखा परीक्षणातील सुमारे ८० मुद्यांवर दोन सत्रात चर्चा झाली़ १३ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर लेखा व वित्त अधिकारी अनारसे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही़ त्यामुळे सदस्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली़ शिक्षण विभागाने पोषण आहाराचे १३ कोटी बँक खात्यावर का ठेवले, या प्रश्नावर अधिकाºयांना समर्पक उत्तर देता आले नाही़
कामाचे वाटप करण्यापूर्वी रॉयल्टी भरून का घेतली जात नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ कामाचे वाटप करण्यापूर्वी रॉयल्टी भरून घेण्याचे निर्देश या समितीने दिले़ याशिवाय ग्रामपंचायत, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागांच्या लेखा परीक्षणातील आक्षेपांवर यावेळी चर्चा झाली असून, याचीही उत्तरे प्रशासनाला देता आली नसल्याचे समजते़