पतीची ‘सोशल’ बदनामी करून पत्नीने काढला राग, फेसबुकवर उघडले होते बनावट अकाउंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:48 PM2021-01-09T12:48:30+5:302021-01-09T12:49:17+5:30
बदला घेण्यासाठी कोण काय कृती करेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. रागावलेल्या पत्नीने पतीवरील राग व्यक्त करण्यासाठी थेट सोशल मीडियाचाच आधार घेतला. तिने तिच्या पतीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्याच्या नावे अश्लिल मेसेज व्हायरल केले. या प्रकाराने भांबावून गेलेल्या पतीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे कृत्य करणारी दुसरेतिसरे कुणी नाही तर त्याची पत्नीच निघाली.
अरुण वाघमोडे
अहमदनगर : बदला घेण्यासाठी कोण काय कृती करेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. रागावलेल्या पत्नीने पतीवरील राग व्यक्त करण्यासाठी थेट सोशल मीडियाचाच आधार घेतला. तिने तिच्या पतीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्याच्या नावे अश्लिल मेसेज व्हायरल केले. या प्रकाराने भांबावून गेलेल्या पतीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे कृत्य करणारी दुसरेतिसरे कुणी नाही तर त्याची पत्नीच निघाली.
दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी नुकतीच त्या आरोपीला पत्नीला अटक केली. नगर शहरात राहणाऱ्या एका तरुणाचे दौंड येथील उच्चशिक्षित तरुणीशी लग्न झाले होते. काही दिवस दोघांचा सुखाचा संसार झाला. त्यानंतर या दाम्पत्यामध्ये वादाला सुरुवात झाली. वाद विकोपाला जाऊन पत्नीने पतीचे घर सोडून माहेर गाठले. आता एकमेकांपासून वेगळे व्हायचे या निर्णयापर्यंत दोघे गेले.
पती आणि त्याच्या कुटुंबियांविषयी तिच्या मनात मात्र भलताच राग होता. बदला घेण्यासाठी तिने पतीच्या नावे फेसबुवर बनावट अकाउंट उघडले. या अकाउंटच्या माध्यमातून तिने पती आणि त्याच्या कुटुंबियांविषयी अश्लिल व बदनामीकारक मेसेज व्हायरल केले. हे कोण करत आहे याचा काहीच अंदाज तक्रारदार पतीला नव्हता. त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केल्यानंतर हे कृत्य तक्रारदार पतीच्या पत्नीचेच असल्याचे समोर आले. सायबर पोलीस स्टेशनेचे उपनिरिक्षक प्रतीक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, कॉस्टेबल दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, राहुल हुसळे, अरुण सांगळे आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.
आणखी एका महिलेचे असेच कृत्य
सायबर पोलीस स्टेशनमध्ये आठ दिवसांपूर्वी अशाच स्वरुपाची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याची बदनामी करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना असे कृत्य करणारी महिला ही तक्रारदार तरुणाची पत्नी असल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
अल्पवयीन मुलांकडूनही सोशल मीडियाचा गैरवापर
मित्र अथवा मैत्रिणीसोबत वाद झाला तर त्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यासाठी अल्पवयीन मुले-मुली फेसबुक अथवा इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वर्षभरात अशा सहा ते सात तक्रारी येथील सायबर पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. तपासाअंती हे कृत्य अल्पवयीन मुलांचे असल्याचे समोर आले आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना मोबाईल दिल्यानंतर तो त्या मोबाईलचा कसा वापर करतो याकडे पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक प्रतिक कोळी यांनी केले आहे.